Breaking News

अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी

पाली व जांभूळपाडा पूल पाण्याखाली; वाहतूक ठप्प

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी (दि. 21) अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे वाकण-पाली-खोपोली मार्गावरील पाली व जांभुळपाडा पुलावरून पाणी गेले. या पुलांच्या दोन्ही बाजूंकडील वाहतूक तासनतास ठप्प झाली होती. तसेच जांभुळपाडा ते कळंब, जांभुळपाडा ते माणगाव बुद्रुक रस्ता रहदारीसाठी बंद केल्याची माहिती तहसीलदार रायन्नावार यांनी दिली.

खोपोली-पाली-वाकण रस्त्यावर पाली व जांभुळपाडा येथे असलेल्या अंबा नदी पुलांवरून पाणी गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे बुधवारी सकाळी कामावर निघालेले चाकरमानी, शेतकरी, व्यवसायिक यांना अडकून पडावे लागले. या ठिकाणी  पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान, पाली येथे आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सुधागड तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सखोल व खोलगट भागात पाणी घुसले आहे. नद्या, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. येथील गावांना जोडणार्‍या पुलांवरुन पाणी वाहत असल्याने वाहतुकीस अडसर निर्माण झाल्याचे दिसून आले. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे उन्मळून पडत आहेत. तर भुस्खलनाने दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे.

मुसळधार पावसामुळे अंबा नदीवरील पाली व जांभूळपाडा येथील पूल पाण्याखाली गेले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने महसूल, आपत्ती व्यवस्थापनासह पोलीस प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. तालुक्यात पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये. व अधिक सतर्क राहावे.

-दिलीप रायन्नावर, तहसीलदार, पाली-सुधागड

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply