Breaking News

सहा राज्यांत भीषण पाणीसंकट

केंद्राने दिल्या खबरदारीच्या सूचना; जलपातळी दिवसेंदिवस होत आहे कमी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

देशात वाढत्या तापमानासोबत भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. देशातील सहा राज्यांमध्ये पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या राज्यातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. पाणीसंकट पाहता केंद्र सरकारने या सहा राज्यांसाठी खबरदारीची सूचना जारी केली आहे. मान्सून येईपर्यंत या राज्यांत पाण्याचा वापर करताना काळजी बाळगावी लागणार आहे. काही काळ या राज्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

केंद्र सरकारने खबरदारीची सूचना जारी केलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांतील धरणातील पाणीसाठा खालच्या स्तरावर पोहचल्याने पाणीटंचाई जाणवू शकते. येणार्‍या काळात हे पाणीसंकट आणखी भीषण होणार आहे. मागील 10 वर्षांत पहिल्यांदा पाणीसाठ्याची सरासरी 20 टक्क्यांहून कमी झाली आहे.

पश्चिम विभागातील गुजरातेत 10 आणि महाराष्ट्रात 17 जलाशये आहेत. या जलशयांची जिवंत पाणीसाठ्याची एकूण क्षमता 31.26 अब्ज घनमीटर आहे, तथापि 16 मेपर्यंत या जलाशयांतील जिवंत साठा 4.10 अब्ज घनमीटर होता. एकूण जिवंत साठ्यापेक्षा हे प्रमाण 13 टक्के आहे. मागच्या वर्षात या 27 जलाशयांतील पाणीसाठ्याचे प्रमाण 18 टक्के, तर मागील 10 वर्षांत 22 टक्के होते. दक्षिण भागात आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूचा समावेश आहे. या राज्यांतील 31 जलाशयांतील जिवंत साठ्याची एकूण क्षमता 51.59 अब्ज घनमीटर आहे. केंद्रीय जल आयोगाच्या पाहणीनुसार फक्त 6.86 अब्ज घनमीटर जिवंत साठा आहे. हे प्रमाण एकूण जिवंत साठ्याच्या 13 टक्के आहे.

देशभरातील मोठ्या 91 जलशयांतील उपलब्ध पाणीसाठ्याचे केंद्रीय जल आयोगाकडून आकलन केले जाते. केंद्रीय आयोगाने गुरुवारी जारी केलेल्या पाणीसाठा आकडेवारीनुसार आजघडीला 35.99 अब्ज घनमीटर पाणीसाठा आहे. या जलशयांच्या एकूण पाणी साठवण क्षमतेपेक्षा हे प्रमाण 22 टक्के आहे. या 91 जलाशयांची पाणीसाठवण क्षमता एकूण 161.993 अब्ज घनमीटर आहे. 9 मे रोजी संपलेल्या आठवड्यातील उपलब्ध पाणीसाठा 24 टक्के होता. त्यामुळे पश्चिम आणि दक्षिणेकडील राज्यांतील पाणीटंचाईची स्थिती गंभीर दिसत आहे.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply