पनवेल ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी आग्रही मागणी सन 2008पासून सर्वस्तरातून होत असताना एप्रिल 2021मध्ये दुसरे नाव समोर आल्याने ‘दिबां’च्या नावासाठी संघर्षाची ज्योत तयार करण्याचे काम जासई गाव आणि चळवळीतील समाजप्रिय कार्यकर्ता मेघनाथ म्हात्रे व सहकार्यांनी केले. मेघनाथ यांना काळाने आपल्यातून हिरावून नेले, पण त्यांनी पेटवलेली ज्योत पुढील लढ्यासाठी मार्गदर्शक आहे, असे भावपूर्ण उद्गार रविवारी (दि. 1) जासई येथे मेघनाथ म्हात्रे यांच्या शोकसभेत व्यक्त झाले. लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे सक्रिय कार्यकारिणी सदस्य मेघनाथ अमृत म्हात्रे (जासई, ता. उरण) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी जासई येथील लोकनेते दि. बा. पाटील मंगल कार्यालयात शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त करून म्हात्रे कुटुंबीयांचे सांत्वन केले. या शोकसभेला लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, अतुल पाटील, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, दशरथ भगत, सरपंच संतोष घरत, जे. डी. तांडेल, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, रवींद्र पाटील, भाजपचे उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह, कामगार नेते सुरेश पाटील, चंद्रकांत घरत, राजेश गायकर, ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील म्हणाले की, मेघनाथ म्हात्रे हे नम्र, सामाजिक भान असलेले, सच्चे आणि दिलदार व्यक्तिमत्त्व होते. व्यक्ती अनेक घडत असतात, पण कृतिशील व्यक्तिमत्त्व अल्प असतात. मेघनाथ हे असेच कृतिशील व्यक्तिमत्त्व होते. कुठल्याही परिस्थितीत लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला मिळाले पाहिजे आणि त्यासाठी काहीही करावे लागले, तरी चालेल असे त्यांचे सातत्याने सांगणे असायचे. ‘दिबां’च्या नावासाठी संघर्षाच्या रोपट्याचे वटवृक्ष झाले आणि ते रोपटे लावण्यात मेघनाथ म्हात्रे यांचे योगदान होते. त्यामुळे या संघर्षातून प्रकल्पग्रतांना न्याय मिळाला पाहिजे हीच मेघनाथ म्हात्रे यांना श्रद्धांजली ठरेल, तसेच मेघनाथ यांची स्मृती चिरंतर राहावी यासाठी त्यांच्या नावाने वाचनालय, ग्रंथालय किंवा तत्सम वास्तू उभारण्यात यावी. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी म्हटले की, मेघनाथ म्हात्रे आपल्या सर्वांचा लाडका होता. गावाच्या आणि समाजाच्या विकासासाठी नेहमी त्याचा आग्रह असायचा. निष्ठावान सहकारी, विशाल दृष्टिकोन, उत्तम कार्यकर्ता, समाजप्रिय व्यक्तिमत्त्व असे त्याच्यामध्ये भरभरून गुण होते. विमानतळाला ‘दिबा’साहेबांचे नाव मिळावे यासाठी त्याने पुढाकार घेतला. विमानतळाला दुसरे नाव समोर आल्यानंतर त्याने ताबडतोब ग्रामस्थांना एकसंघ केले. ‘दिबां’चेच नाव विमानतळाला असले पाहिजे हे त्याने मनात ठासून ठरवले. त्यानुसार कामही सुरू केले. मोठे काम त्याने हाती घेतले आणि काळाने आपल्यातून त्याला हिरावून घेतले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना मेघनाथ म्हात्रे यांच्या आठवणींना उजाळा देत एक समाजासाठी झटणार्या समाजप्रिय व्यक्तिमत्त्वाला मुकलो असल्याचे अधोरेखित केले. कोरोनाच्या काळात आपल्या जवळच्या अनेक व्यक्तींचे अकाली निधन झाले. ज्यांच्या निधनाने मनाला चटका लागला त्यामध्ये मेघनाथ म्हात्रे एक आहेत. एखादी जबाबदारी दिली आणि ती यशस्वी केली नाही, असे कधीही त्यांच्याकडून घडले नाही. त्यांच्या निधनाने गावाचे हित मानून काम करणारा आणि हक्काने हाक द्यावी असा कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला आहे. जासई गावाच्या विकासासाठी पाठपुरावा करण्याचे काम मेघनाथ म्हात्रे करीत आले. गावाला आपला परिवार मानून त्यांनी काम केले. त्याचबरोबर विमानतळ नामकरणासंदर्भात आंदोलन करण्याच्या आग्रहामध्ये मेघनाथ म्हात्रे होते. कृतीतून काम करणारा हा कार्यकर्ता होता. आंदोलनाच्या तयारीसाठी आणि लढा व्यापक करण्यासाठी मेघनाथ म्हात्रे यांच्या कृतीतून ध्येय निर्माण झाले. ते ‘दिबा’साहेबांच्या नावासाठी लढत राहिले. त्यांचे ध्येय आपण पूर्ण करू या. आमदार महेश बालदी यांनी सांगितले की, मेघनाथ म्हात्रे हा लढवय्या कार्यकर्ता होता. सर्व क्षेत्रांत हिरिरीने सहभाग घेणारी व्यक्ती आपल्यातून निघून जाते तेव्हा मनाला खूप वाईट वाटते. असेच मेघनाथ यांच्या निधनाने सर्वांचे झाले असून तो आमचा एक दुर्मिळ सहकारी होता. संघर्षाच्या लढाईत त्याने पुढाकार घेतला. बैठका, चर्चा, मोर्चा, आंदोलन सर्व बाबतीत त्याचा सहभाग प्रेरणादायी होता. 24 जूनच्या आंदोलनानंतर मेघनाथ आजारी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. तेव्हापासून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मला व आमदार प्रशांत ठाकूर यांना वारंवार मेघनाथ यांच्या उपचाराबाबत दक्षता घेण्यास सांगितले. जीव वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू होते. डॉक्टरांच्या संपर्कात आम्ही कायम होतो, मात्र सर्व प्रयत्न अपयशी ठरले आणि जीवलग सहकार्याला आम्ही गमावले. मी निधनानंतर सहसा रडत नाही, मात्र मेघनाथ म्हात्रे यांच्या निधनाचे वृत्त कळताच रडू कोसळले, असे सांगतानाच विमानतळाला ‘दिबां’चेच नाव मिळाले पाहिजे ही मेघनाथ व आपल्या सर्वांची इच्छा आहे आणि तीच खरी श्रद्धांजली ठरेल.
मेघनाथ म्हात्रेंचे स्वप्न पूर्ण करूया -लोकनेते रामशेठ ठाकूर
प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी पुढाकार घेण्यामध्ये मेघनाथ म्हात्रे अग्रणी होते. ‘दिबां’च्या निधनानंतर महाराष्ट्र हळहळला होता तशाच प्रकारे मेघनाथ म्हात्रे यांच्या निधनाने पनवेल, उरणमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत मेघनाथ म्हात्रे यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांना अवघे 45 वर्षांचे आयुष्य लाभले, पण त्यापेक्षा त्यांचे कार्य मोठे होते. त्यांचे स्वप्न आपल्या सर्वांना पूर्ण करायचे आहे आणि संघर्षाची ही लढाई यशस्वी करण्यासाठी शेकडो मेघनाथ तयार झाले पाहिजेत, असे सांगून येत्या 9 ऑगस्टला क्रांतिदिनी जासई येथे मशाल मोर्चा होणार आहे. तेथून ही मशाल 200 गावांत मोर्चाचे स्वरूप घेणार आहे. 15 ऑगस्ट ही डेडलाइन आपण दिली आहे, अन्यथा 16 ऑगस्टपासून विमानतळ काम बंद आंदोलन जाहीर केले आहे, असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वेळी सांगितले.
मेघनाथ म्हात्रे आज आपल्यात नाहीत याचे खूप दुःख होत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे ही मेघनाथ म्हात्रेंची इच्छा होती. त्यांची ती इच्छा पूर्ण व्हावी.
-अतुल पाटील