गुन्हा दाखल करण्याचे तहसीलदारांचे आदेश
मुरूड : प्रतिनिधी
मुरूड तालुक्यात असलेल्या विहूर व शिघ्रे येथील पेट्रोल पंपावर मालकांनी सर्वसामान्य नागरिकांना मागेल तेवढे पेट्रोल दिल्याने शनिवारी (दि. 2) या दोन्ही पंपांवर मोठी गर्दी गर्दी जमली होती. दुचाकी वाहनांच्या रांगा दूरवर पसरून सोशल डिस्टन्सिंगलाही हरताळ फासला गेला. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असल्याचे तहसीलदारांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन व संचारबंदी लागू असल्याने पेट्रोल पंपावर फक्त अत्यावश्यक सेवेत असलेल्या पासधारकांनाच इंधन दिले जात आहे. इतर सामान्य नागरिकांना मनाई आहे. त्यामुळे पेट्रोल पंपांवर गर्दी पहावयास मिळत नव्हती, मात्र शनिवारी विहूर व शिघ्रे या दोन्ही पंपमालकांनी सामान्य नागरिकांना मागेल तेवढ्या रकमेचे पेट्रोल दिल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाची पायमल्ली केली.
याबाबत मुरूडचे तहसीलदार गमन गावित यांना विचारणा केली असता, शासकीय आदेशाचे पालन न करणार्या पेट्रोल पंपांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांनी दिले असल्याचे त्यांनी सांगितले, तर पेट्रोल पंपमालकांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, जिल्हाधिकार्यांच्या 30 एप्रिलच्या आदेशान्वेय सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल वितरित करण्याचे आदेश निगर्मित केले होते त्याप्रमाणे आम्ही पेट्रोल वितरित केले.