काळनदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी
माणगाव : प्रतिनिधी
मुसळधार पावसामुळे माणगाव तालुक्यात सर्वत्र जलमय स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील अनेक गावांना पाण्याचा वेढा पडल्याने त्यांचा संपर्क तुटला आहे. काळनदीने माणगावमध्ये धोक्याची पातळी ओलांडली आहे. तालुक्यात गुरुवार (दि. 22) सकाळपर्यंत 168 मिमी पावसाची नोंद झाली असून हवामान खात्याने 24 जुलैपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
गेली आठ दिवस रायगड जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. माणगाव तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे. तालुक्यातील कळमजे, खरवली, बामणोली, निळगुन, जावळी, मुगवली, तळेगाव, रिळे, पाचोळे, निजामपूर विभागातील गावे, गोरेगाव व लोणेरे विभागातील गावे, मोर्बा व पळसगाव विभागातील गावांना पावसाच्या पाण्याचा वेढा पडल्याने त्यांचा माणगाव संपर्क तुटला आहे. पुढील 48 तासांत हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविल्याने नदीकाठच्या गावांतील लोकांनी तसेच ग्रामीण भागातील लोकांनी सावधानता व सतर्कता बाळगण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांनी केले आहे.