Breaking News

रायगडात पुन्हा दरड कोसळली; हिरकणीवाडीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले

अलिबाग ः प्रतिनिधी

रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीत दरड कोसळली असून तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घटनेनंतर येथील 15 घरांतील 78 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याची दाणादाण उडवली आहे. संततधार पावसाने मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, जीवितहानीही प्रचंड झाली आहे. महाड तालुक्यातील तळीये गावात झालेल्या दुर्घटनेने, तर अवघा महाराष्ट्र हळहळला. या दुर्घटनेनंतर सुरू झालेल्या आक्रोशाचा टाहो शांत होण्याआधीच आणखी एक दरड कोसळल्याची दुर्घटना महाडमधील हिरकणीवाडीत घडली आहे. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र तळीयेतील दरड दुर्घटनेनंतर ही घटना घडल्याने हिरकणीवाडीत भीतीचे वातावरण आहे. मागील दोन दिवसांपासून येथे दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. गावातील घरांना तडे गेले आहेत. दरम्यान, लक्ष्मी ऑर्गेनिक केमिकल्स या कंपनीत वायुगळती होऊन स्फोट होणार ही अफवा आहे. लोकांनी घाबरून घर सोडून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply