पनवेल ः वार्ताहर
कळंबोली येथील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट व्यवस्थापकाच्या मनमानीला कंटाळून येथील कर्मचार्यांनी शुक्रवारी (दि. 23) काम बंद आंदोलन केले. याबाबत भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकार्यांना माहिती मिळताच त्यांनी मॅकडोनाल्ड येथे जाऊन आंदोलकांची बाजू प्रखरपणे मांडली, तसेच पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर आणि महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर यांनीही संबंधित कर्मचार्यांना पाठिंबा देऊन व्यवस्थापनाला जाब विचारला. त्यानंतर कर्मचार्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. कळंबोली येथे मॅकडोनाल्ड रेस्टॉरंटमध्ये काम करणार्या कर्मचार्यांना व्यवस्थापकाकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे. त्यांच्या वेतनामध्ये कपात करणे, वेळेच्या अगोदर कामावर बोलवणे, जास्त वेळ काम करून घेणे त्याचबरोबर इतर अनेक प्रकारे त्रास संबंधित व्यवस्थापक कर्मचार्यांना देत होता. काही दिवसांपूर्वीच त्याची या ठिकाणी बदली झाली होती. येथे काम करणारे सर्व कर्मचारी स्थानिक असल्याने बाहेरून आलेला व्यवस्थापक हेतुपुरस्सर त्यांच्यावर अन्याय करीत होता. या संदर्भात व्यवस्थापनाकडे तक्रार केल्यानंतरही त्याच्यावर कोणतीच कारवाई होत नव्हती. अखेर कळंबोली मॅकडोनाल्ड कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. आंदोलकांनी ही माहिती भाजप युवा मोर्चाचे कळंबोली अध्यक्ष गोविंद झा यांना दिली असता, त्यांनी त्वरित धाव घेऊन आंदोलकांची भूमिका जोरकसपणे मांडली, तसेच या आंदोलनाची माहिती मिळताच पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती मोनिका प्रकाश महानवर, भाजपचे कळंबोली मंडल अध्यक्ष रविनाथ पाटील, युवा नेते रामदास महानवर यांनी उपस्थित राहून संबंधित कामगारांना पाठिंबा दिला आणि व्यवस्थापनासोबत चर्चा केली. अशा प्रकारे व्यवस्थापक मग्रूरपणे वर्तन करीत असेल, त्याचबरोबर जाणूनबुजून कर्मचार्यांना त्रास देत असेल तर संबंधित व्यवस्थापकाची इतरत्र बदली करण्यात यावी, अशी मागणी सभागृह नेते परेश ठाकूर आणि सभापती मोनिका महानवर यांनी या वेळी केली. या संदर्भात व्यवस्थापनाने नमते धोरण घेत कर्मचार्यांच्या मागण्या मान्य केल्या. या वेळी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमर ठाकूर, कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, अल्पसंख्याक सेल कळंबोली शहर अध्यक्ष अझर शेख हेही उपस्थित होते. न्याय मिळाल्याने कर्मचार्यांनी सभागृह नेते परेश ठाकूर, इतर नेते, पदाधिकारी, भाजप, युवा मोर्चा यांचे आभार मानले. दरम्यान, असाच प्रकार पुन्हा जर सुरू राहिला, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.