नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा सरकारचा नसून देशातील 130 कोटी जनतेचा उत्सव आहे. देशाच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी एकत्र येणे, देश प्रथम या भावनेतून काम करणे आवश्यक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 25) मन की बात कार्यक्रमात बोलताना सांगितले. कोरोना विषाणू संसर्ग संपला नसल्याने नियमांचे पालन करा, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना या वेळी केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना तिरंगा घेऊन जाताना पाहून केवळ मलाच नाही तर संपूर्ण देशाला आनंद झाला होता. मित्रांनो, या वेळी 15 ऑगस्ट रोजी देश स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी दाखल होत आहे. हे आपले मोठे भाग्य आहे की आपण स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचे साक्षीदार आहोत. 15 ऑगस्ट रोजी एक अनोखा प्रयत्न करणार आहोत. या दिवशी शक्य तेवढे भारतीय राष्ट्रगीत गाण्याचा संस्कृती मंत्रालयाचा प्रयत्न आहे. यासाठी राष्ट्रीय गान डॉट कॉम तयार करण्यात आले आहे. या वेबसाइटच्या मदतीने आपण राष्ट्रगीत रेकॉर्ड करता येईल. देशाच्या प्रत्येक नागरिकाने भारत जोडो आंदोलनाचे नेतृत्व करावे. उद्या म्हणजे म्हणजे 26 जुलै हा ‘कारगिल विजय दिवस’ आहे. कारगिल युद्ध हे भारतीय सैन्यातील शौर्य आणि संयम यांचे प्रतीक आहे, जे संपूर्ण जगाने पाहिले आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.