Breaking News

पंतप्रधान आवास योजनेतून दरडग्रस्तांचे पुनर्वसन करणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची तळीयेत घोषणा

महाड ः प्रतिनिधी

कोणाचाही जीव आपण परत आणू शकत नाही, पण जे या घटनेतून वाचले त्यांना सांभाळण्याचे काम आम्ही करू. एकाही आपद्ग्रस्ताला बेघर राहू देणार नाही. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत प्रत्येक दरडग्रस्ताला घर बांधून दिले जाईल, अशी घोषणा केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी रविवारी (दि. 25) तळीये येथे केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी सकाळी दरडग्रस्त तळीये गावाची पाहणी केली. जिल्हाधिकारी निधी चौधरी सोबत होत्या. या वेळी ग्रामस्थांना आणि मृतांच्या नातेवाईकांना दिलासा देत राणे यांनी सरकार यथोचित मदत करेल, तसेच प्रत्येक आपद्ग्रस्ताचे पुनर्वसन केले जाईल, अशी ग्वाही दिली. पाहणीनंतर माध्यमांशी बोलताना राणे म्हणाले की, अतिशय दुर्दैवी घटना आहे. नैसर्गिक आपत्ती असल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. 44 मृतदेह सापडले आहेत. इतरांचा शोध घेतला जात आहे. बचाव पथकाचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र आणि राज्याकडून मदत देण्यात आली असली, तरी या मदतीपलीकडे आणखी मदत होणार नाही असे नाही. त्याचे पुनर्वसन पंतप्रधान आवास योजनेतून केले जाईल. त्यांना चांगली आणि पक्की घरे दिली जातील. या माणसांच्या मागण्या सोडवण्यासाठी स्वतंत्र प्रांत अधिकारी नेमण्याची सूचना केली आहे. काही लोकांनी तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्याची मागणी केली. त्यांचे मनाप्रमाणे पुनर्वसन केले जाईल. कायमस्वरूपीदेखील स्थानिक गावातील लोकं सुचवतील त्या ठिकाणी त्यांचे पुनर्वसन व सर्व नागरी सुविधा त्यांना दिल्या जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या नुकसानीची माहिती दिली जाईल. मी येतानाच पंतप्रधानांशी बोललो आहे. त्यांनी मला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. कोकणात कायमस्वरूपी एनडीआरएफची तुकडी ठेवण्यासंदर्भात केंद्राकडे मागणी करू. कुणावर आरोप करण्याची ही वेळ नाहीये. घडलेल्या घटनेमधील जे दुःखात बुडालेले आहेत त्यांचे प्रश्न आपण आधी सोडवू. नंतर बाकीचे बघू, असे आवाहन करीत राणे यांनी सामंजस्याची भूमिका घेतली. या वेळी राज्य सरकारशी या संदर्भात काही चर्चा झाली आहे का, असा प्रश्न राणे यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. राज्य सरकारची लोक भेटत नाहीत, बोलत नाहीत. आता कुठे घरातून डिस्चार्ज झाला आहे. आता फिरत आहेत, अशा शब्दांत राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. या वेळी फडणवीस माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ही घटना घडल्यानंतर आमचे सहकारी प्रवीण दरेकर सर्वांत आधी या ठिकाणी पोहचले. त्यांनी येथे प्रशासन लवकर येईल असा प्रयत्न केला. या भागाची आम्ही पाहणी केली. एनडीआरएफ युद्धपातळीवर काम करीत आहे. आमचे इथेच एक किलोमीटरवर पुनर्वसन करा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, महावितरणचे दोन टॉवर कोसळल्यामुळे महाड शहर, एमआयडीसीसह तालुक्याचा वीजपुरवठा खंडित झाला असून तो आणखी सहा दिवस तरी पूर्ववत होणार नाहीए, मात्र या दरम्यान शहरात पाणीपुरवठाही बंद असल्याने लोकांचे हाल होत आहेत तसेच साफसफाई होत नसल्याने रोगराई पसरण्याची शक्यता आहेत. दवाखांन्याचे जनरेटर बंद असल्याने सर्व दवाखाने, हॉस्पिटल बंद आहेत. कोरोना महामारीचा विचार करता शहरात वीजपुरवठा त्वरित सुरू करण्याची गरज आहे. यावर पत्रकार महेश शिंदे यांनी लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीच्या थर्मल पॉवर प्लांटमधून महाड शहराला वीजपुरवठा करता येईल, असे सूचविले. या वेळी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना याबाबत सूचना दिल्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांनी महाड महावितरण अधिकार्‍यांना निर्देश दिले आहेत. या वेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, सरचिटणीस मिलिंद पाटील, उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, राजेश मापारा, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग, सोपान जांभेकर, युवा नेते ललित पाटील, बिपीन महामुणकर, नाना महाले, अक्षय ताडफळे, श्वेता ताडफळे मंजुषा आदी उपस्थित होते.

एकत्रपणे काम करण्याची वेळ -देवेंद्र फडणवीस

या घटनेचे राजकारण करण्याची किंवा कुणावर टीका करण्याची ही वेळ नाही, तर सर्वांनी एकत्र मिळून काम करण्याची आहे. सध्या ढिगार्‍याखालून मृतदेह बाहेर काढणे आणि नुकसानग्रस्तांचे पुनर्वसन करणे महत्त्वाचे आहे, असे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या वेळी म्हणाले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply