Breaking News

ग्रामदैवत श्री कोटेश्वरी देवीच्या यात्रेस प्रारंभ

मुरूड : प्रतिनिधी : मुरूडचे ग्रामदैवत श्री कोटेश्वरी देवीच्या यात्रेस सुरुवात झाली असून, हे मंदिर सजवण्यात आले आहे. या देवीच्या दर्शनासाठी मुंबई, पुणे, कल्याण व डोंबिवली भागातील असंख्य भक्तगण आल्याने मुरूडमध्ये भाविकांची गर्दी झाली आहे.

मुरूड समुद्रात कासा किल्ल्यात शिवाजीराजांनी भवानी मातेची स्थापना केली आहे. कोट म्हणजे किल्ला आणि किल्ल्यातील देवी म्हणून कोटेश्वरी असे येथील देवीला लोक संबोधू लागले. पुढे पुढे कोटेश्वरी देवी नाव रूढ झाले. आख्यायिका अशी आहे की, काही अकल्पित घटना घडल्यामुळे देवीने कासा किल्ल्यातील मूळ स्थान सोडले आणि देवीचा मुखवटा मुरूड किनार्‍यावरील एका शेतात काठीवर आढळला. गावकर्‍यांनी देवीची इच्छा समजून शेतात मंदिर बांधून मुखवट्याची स्थापना केली. पुढे सिद्दी नवाबाने मंदिर परिसरातील शेतजमीन दैनंदिन ख़र्चाकरिता देवस्थानाला दान केली.

देवस्थानच्या विश्वस्त मंडळामध्ये गावातील प्रत्येक जातीच्या प्रतिनिधीचा समावेश असतो. नवरात्रात श्री कोटेश्वरी देवीच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील आबालवृद्ध मंदिरात येतात. या कालावधीत मंदिरात धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. 1970 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून दरवर्षी चैत्र शुद्ध चतुर्दशीला मोठी यात्रा भरते. गेल्या 12 ते 14 वर्षापासून देवीची पालखी मिरवणूक मोठ्या जल्लोषात काढली जाते.

कोटेश्वरी हे साक्षात तुळजाभवानीचे जागृत रूप मानले जाते. व्याघ्रावर आरूढ झालेल्या या आदिशक्तीचे रूप अतिशय तेजःपुंज व मोहक दिसते. त्रिशूल, ढाल, तलवार, प्रभावळ, कमरपट्टा, पैंजण आणि मुखवटा न्याहाळताना या देवी सर्वभुतेषु शक्तिरूपेण संस्थितः म्हणत भक्तगण भक्ती स्वरूपात तद्रुप होतात.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply