Breaking News

दिदी के हसीन सपनें

ममता बॅनर्जी सध्या पाच दिवसांच्या दिल्ली दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यात त्यांनी निरनिराळ्या विरोधी पक्षांची एकत्र मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसले. आगामी लोकसभा निवडणूक ही मोदी विरुद्ध भारत अशी असेल, असे त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. मोदी सरकारचा पाडाव करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. इतकेच नव्हे तर भाजपच्या मित्रपक्षांनादेखील त्यांनी आमिष दाखवल्याचे दिसते. हे सारे कशासाठी? तर केवळ आणि केवळ मोदी विरोधासाठी.

गेली सात-आठ वर्षे जंग जंग पछाडूनदेखील मोदी विरोधकांना आपल्या देशामध्ये अजूनही म्हणावे तसे यश मिळू शकले नाही हे तर दिसतेच आहे. काही मोजक्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला सत्ता प्राप्त करता आली नाही हे खरे असले तरी त्याचा अर्थ मोदी विचारधारेचा पराभव झाला असा काढता येणार नाही. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा मिळवूनदेखील भाजपला सत्ता मिळवता आली नाही, त्याची कारणे वेगळीच होती. विश्वासघाताचे राजकारण राजकीय नैतिकतेच्या चौकटीत बसवले की याचे सोपे उत्तर काढता येते. ऐनवेळी पाठीत खंजीर खूपसून विरोधी पक्षांची मोट बांधून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले गेले. महाराष्ट्राच्या मतदारांना ही गोष्ट निश्चितच आवडलेली नसणार. पश्चिम बंगालमध्ये भाजपने उभे केलेले कडवे आव्हान मोडून काढत तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी आपली निर्विवाद सत्ता शाबूत ठेवली. भारतीय जनता पक्षाला तेथे सत्ता आणता आली नसली तरी तीन आमदारांवरून हा पक्ष पाऊणशे जागांपर्यंत मजल मारू शकला हा खरे तर ममतादिदींनी धोक्याचा इशारा मानायला हवा, पण विजयाचा उन्माद भलभलती स्वप्ने दाखवू लागतो हेच खरे. बंगालच्या दिदींना आता पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखण्यासाठी गेल्या सात-आठ वर्षांत अनेकांनी प्रयत्न करून पाहिले. त्यात कुणालाही आजवर यश आलेले नाही. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपची घोडदौड रोखली असली तरी हे यश एका राज्यापुरते मर्यादित आहे. तथापि भाजपला रोखण्यामध्ये काही प्रमाणात यश मिळवलेल्या ममतादिदींनी देशाचे नेतृत्व करावे अशी अपेक्षा ठेवणार्‍या मोदी विरोधकांना अल्पसंतुष्टतेने किती ग्रासले आहे हे दिसून येते. विरोधक कितीही एकत्र आले तरी पंतप्रधान मोदींचा पराभव करणे किंवा त्यांच्या पराभवाचे स्वप्न पाहणे हे या घटकेला तरी हास्यास्पद ठरेल. कारण देशाच्या विकासासाठी पंतप्रधान मोदी यांनी जे प्रामाणिक प्रयत्न चालवले आहेत ते सारी जनता पाहते आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यपद्धतीवर भारतीय जनतेचा ठाम विश्वास आहे हे गेल्या निवडणुकीच्या वेळी सिद्ध झाले आहे. सन 2019मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा रथ अडवण्याचे कमी का प्रयत्न झाले? तेव्हादेखील सोनिया गांधींपासून अनेकांनी एकाच मंचावर एकत्र येऊन मोदी विरोधाचे रणशिंग फुंकले होते. विरोधी ऐक्याच्या त्या दांभिक प्रयत्नांवर मात करीत भाजपने भरघोस मतांचे दान स्वीकारत पुन्हा एकदा दिल्ली काबीज केली. ममतादिदी यांचे विरोधकांची मोट बांधण्याचे नवे प्रयत्नही कुचकामी ठरणार आहेत हे सांगण्यासाठी कुणाही भविष्यवेत्त्याची गरज नाही.

Check Also

संगीतकार राजेश रोशन 50 वर्षांचे करियर : एक रास्ता है जिंदगी…

यश चोप्रा निर्मित व रमेश तलवार दिग्दर्शित दुसरा आदमी (1977) या चित्रपटातील चल कहीं दूर …

Leave a Reply