पर्यटकांसह वाहनचालकांचा झाला खोळंबा
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अमृतांजन ब्रिजजवळ शनिवारी (दि. 26) सकाळच्या सुमारास एक टँकर उलटून त्यातील रसायन रस्त्यावर पसरले. त्यामुळे एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. परिणामी वीकेण्डच्या सुटीसाठी निघालेले पर्यटक तसेच अन्य प्रवाशांचा खोळंबा झाला.
एक्स्प्रेस वेवर सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. उलटलेल्या टँकरमधून पडलेले रसायन मेणासारखे वितळून मार्ग निसरडा झाला. यामुळे प्रवासी व वाहनचालकांना बोरघाटात कोंडीचा सामना करावा लागला. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याची झळ खोपोली, खालापूरपर्यंत पोहचल्याचे चित्र होते.
एक्स्प्रेस वेवरील अपघाताचा फटका जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून प्रवास करणार्यांनाही बसला. एकवीरा कार्ला गेट ते लोणावळ्यादरम्यान वाहनांची रांग लागली होती. पोलीस व स्थानिक तरुणांनी ग्रिट व माती आणून निसरड्या झालेल्या मार्गावर टाकली. मग तब्बल पाच तासांनंतर वाहतूक हळूहळू सुरू झाली.
50हून अधिक वाहनांचे नुकसान
प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या क्लच व ब्रेकवर अतिभार पडल्याने किमान 50हून अधिक वाहनांचे क्लच, ब्रेक निकामी झाले. ही वाहने ऐन कोंडीत घाटातच बंद पडली. त्यामुळे दुहेरी वाहतूक कोंडीची समस्या सोडविताना वाहतूक पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांची दमछाक झाली.