टोकियो ः वृत्तसंस्था
भारतीय महिला हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला 1-0ने पराभूत करून ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. सामना सुरू झाल्यानंतर पहिल्याच क्वार्टरमध्ये भारताच्या शर्मिला देवीला दुखापत झाल्याने मैदानाबाहेर जावे लागले. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. दुसर्या क्वार्टरमध्ये भारतीय महिला संघाने आपले खाते उघडले. जागतिक क्रमवारीमध्ये दुसर्या स्थानी असणार्या ऑस्ट्रेलियन महिला संघाची बचाव फळी भेदत भारताच्या गुरजीत कौरने पेनल्टी शॉर्टवर गोल केला. या गोलसहीत पहिल्या हाफमध्ये भारताने 1-0ची आघाडी मिळवली. भारताने ही आघाडी कायम ठेवत उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. भारतीय महिला हॉकी संघावर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान मोदींनी भारतीय महिला हॉकी संघाचे अभिनंदन केले.
41 साल बाद..!
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याआधी आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याची किमया साधली होती. 41 वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय महिला संघाने ऑलिम्पिकमध्ये इतकी चमकदार कामगिरी केलीय. तीन वेळा विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करण्याचा भीमपराक्रम भारतीय महिलांना करून दाखवत थाटात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
भारतीय महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. संघाने प्रथमच उपांत्य फेरी गाठली आहे. देशातील 130 कोटी लोक देशाच्या महिला हॉकी संघासोबत आहेत.
-अनुराग ठाकूर, केंद्रीय क्रीडामंत्री