Breaking News

खेलरत्नांची खाण

ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीला दाद देण्यासाठी बहुतेक सर्वच प्रसिद्धीमाध्यमे पुढे सरसावली. सोशल मीडियावर लोकांनी भारतीय खेळाडूंवर कौतुकाचा अक्षरश: वर्षाव केला. अजुनही तो सिलसिला चालूच आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय खेळाडूंनी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये हे यश मिळवले आहे हे विसरता कामा नये. कोरोनाच्या महासाथीमध्ये सरावासाठी वेळ देणे मुश्किल झाले होते. संसाधनांची कमतरता तर आपल्या खेळाडूंच्या पाचवीलाच पुजलेली आहे. हे चित्र बदलायलाच हवे.

टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा सोहळ्यातील गुरुवारचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरला. पुरुषांच्या हॉकीमध्ये 41 वर्षांहून सुरू असलेला पदकांचा दुष्काळ संपुष्टात आणत भारताच्या संघाने कांस्य पदकाची कमाई केली. कुस्तीमध्ये 57 किलो वजनी गटात रवीकुमार दहिया या कुस्तीगीराला सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली. परंतु रौप्य पदक जिंकून त्याने भारताची पदकपंचमी साजरी केली. टोक्यो ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंच्या यशामुळे देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कोरोनाची महासाथ, ठिकठिकाणी आलेले महापूर आदी नैसर्गिक संकटांमुळे विकल झालेल्या भारतीय समाजमनावर टोक्योतील यशाने सुखद फुंकर घातली. कुस्तीमधील रवीकुमार दहियाला मिळालेले रौप्य पदक भारतासाठी विशेष म्हणावे लागेल. अंतिम फेरीत रशियन ऑलिम्पिक समितीच्या जावुरयुग्येव्ह याने आपला अनुभव पणाला लावत दाहियाला सात विरुद्ध चार असे नमवले. रवीला रौप्य पदकावर समाधान मानावे लागल्यामुळे भारताचा ऑलिम्पिकमधील पहिल्या सुवर्ण पदकाचा शोध अपूर्णच राहिला हे खरे. परंतु त्यामुळे दहियाची कामगिरी अजिबात कमी दर्जाची ठरत नाही. 2012 सालच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने सहा पदके जिंकली होती. शुक्रवारी सकाळी भारताचा महिला हॉकी संघ कांस्य पदकाला गवसणी घालेल असे वाटले होते. परंतु रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक विजेत्या ब्रिटनशी लढताना भारतीय महिला संघ पराभूत झाला. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला संघाने अद्वितीय कामगिरी बजावली आहे. आतापर्यंत वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू, बॅटमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधू, बॉक्सिंगमध्ये लवलिना बोर्गोहाइन, कुस्तीमध्ये रवीकुमार दहिया आणि हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघाने झगझगीत कामगिरी बजावली आहे. 137 कोटी लोकसंख्येच्या या देशामध्ये उत्तम गुणवत्ता असलेले आणखीही अनेक खेळाडू मौजुद आहेत. ही गुणवत्ता हेरणारी दृष्टी आणि यंत्रणा त्यासाठी आवश्यक आहे. सुदैवाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा द्रष्टा आणि समर्थ नेता भारताला लाभला आहे. त्यांच्या परिपक्व नेतृत्वाची मधुर फळे आता कुठे दृष्टिपथात येऊ लागली आहेत. काही वर्षांपूर्वी भारतीय क्रीडा प्राधिकरणाने कॅच देम यंग ही योजना राबवून भारतातील छुपी क्रीडा गुणवत्ता हुडकण्याचा प्रयत्न केला होता. त्यातूनच लिंबारामसारखा तिरंदाज भारताला गवसला होता. तशाच प्रकारची एखादी शिस्तबद्ध आणि कालबद्ध योजना क्रीडा खात्याने हाती घेतली पाहिजे असे वाटते. या नव्या प्रयत्नांची सुरूवात झाली आहे असे म्हणावयास हरकत नाही. या देशात क्रीडा संस्कृतीने बहरून यावे यासाठी पहिले पाऊल शुक्रवारीच पडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारतर्फे देण्यात येणार्‍या खेलरत्न पुरस्काराचे नव्याने बारसे केले. आजवर हा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार या नावाने ओळखला जात असे. यापुढे तो आधुनिक भारतीय हॉकीचे शिल्पकार मेजर ध्यानचंद यांच्या नावे ओळखला जाणार आहे. तमाम खेळाडूंसाठी ही विशेष गौरवाची बाब आहे.

Check Also

‘सीएए’ आणि गैरसमज

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीएए अर्थात नागरिकत्व दुरूस्ती कायदा देशात लागू करण्याबाबत घोषणा केली …

Leave a Reply