जिगरबाज खेळीने घडवला इतिहास!
टोकियो ः वृत्तसंस्था
टोकियो ऑलिम्पिकमध्ये आदिती अशोकच्या रुपानं गोल्फ प्रकारात भारताला पदक जिंकण्याची आशा निर्माण झाली होती. तिसर्या राऊंडपर्यंत आदिती तमाम भारतीयांच्या अपेक्षेला अगदी तंतोतंत उतरली, मात्र मध्येच खराब हवामानामुळे थांबवण्यात आलेला खेळ पुन्हा सुरू झाला आणि आदिती तिसर्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरली. त्यामुळे 72 होल्सच्या खेळानंतर आदितीला अशोकला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
वर्ल्ड रँकिंगमध्ये अग्रस्थानावर असणार्या नेल्ली कोरडा आणि मोने इनामी यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकावर नाव कोरले, तर न्यूझीलंडच्या लिडिओ कोने कांस्यपदक जिंकले. असे असले तरी पहिल्या तीन राऊंड्समध्ये आदिती दुसर्या स्थानावर कायम होती. आजपर्यंत कोणत्याही भारतीय गोल्फपटूला ऑलिम्पिकमध्ये अशी कामगिरी करता आलेली नाही.
आदिती अशोकने गोल्फच्या मैदानावर आपली कमाल दाखवायला सुरुवात केली. वर्ल्ड रँकिंगमध्ये 200व्या क्रमांकावर असणार्या आदितीने वर्ल्ड रँकिंगमध्ये अग्रस्थानावर असणार्या नेल्ली कोरडा आणि मोने इनामी यांना कडवी टक्कर दिली. तिसर्या राऊंडपर्यंत आदितीने आपले दुसरे स्थान कायम राखले होते. चौथ्या राऊंडच्या 16 होल्सनंतर आदिती तिसर्या स्थानावर आली. याच वेळी खराब हवामानामुळे सामना थांबवण्यात आला. त्या वेळी आदितीला रौप्य किंवा कांस्यपदक जिंकण्याची पुरेपूर संधी होती.
खेळ थांबवला तेव्हा 70 होल्सचा खेळ झाला होता. चौथा राऊंड संपत आला होता. या क्षणापर्यंत आदिती अशोकची तिसर्या स्थानासाठी लिडिओ कोसोबत बरोबरी झाली होती. त्यामुळे पुढच्या दोन होल्सवर सर्वांचे लक्ष लागले होते, मात्र या वेळी लिडिओ कोने आघाडी घेतली आणि आदिती चौथ्या स्थानावर घसरली. 72 होल्सचा खेळ संपल्यानंतर आदिती चौथ्या स्थानी राहिल्यामुळे तिचे पदकाचे स्वप्न भंगले, परंतु आजपर्यंत ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये कोणत्याही भारतीय गोल्फपटूला करता न आलेली कामगिरी आदितीने करून दाखवली आहे.