Breaking News

ताडीमाडी परवाना शुल्काचे समायोजन करण्याची मागणी

मुरूड : प्रतिनिधी

बंदी काळातील परवाना शुल्काचे समायोजन अगामी परवाना शुल्कात करण्याची मागणी ताडीमाडी परवानाधारकांनी केली आहे. गेल्या दोन वर्षापासून कोकणातील ताडीमाडी परवानाधारकांनी आपापल्या दुकानांचे पूर्ण परवाना शुल्क भरले असताना त्यांना जवळपास दहाबारा महिने धड व्यवसाय करता आला नाही. कोरोनामुळे असलेल्या संचारबंदीने व आलेल्या विविध नैसर्गिक संकटामुळे या व्यवसायास खिळ बसल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रायगड जिल्ह्यात दीडशे ते दोनशे, तर संपूर्ण कोकणात सातशे ते आठशे ताडीमाडी परवानाधारक असून कोकणात असलेल्या हजारो कुटुंबांना त्यातून रोजगार मिळतो. ताड व माडांच्या झाडांपासून ताडीमाडीचे उत्पादन काढले जाते. प्रतिवर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात ताडीमाडी विक्री दुकानांचे परवाने लिलाव पद्धतीने शासनस्तरावर दिले जातात. हा व्यवसाय पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असल्याने बर्‍याचदा लिलाव पद्धतीने परवान्यासाठी लावलेली बोली देखील वसूल होत नाही. चक्रीवादळात जमीनदोस्त झालेली नारळाची झाडे व कोरोना महामारीमुळे झालेल्या लॉकडाऊनचेही ग्रहण या व्यवसायाला लागले. ताडीमाडी हे तसे नैसर्गिक पेय आहे. ते आयुर्वेदिक असल्याने मानवी शरीराला थंडावा देणारे आहे. काविळ रोगावरचे ते उत्तम औषध मानले जाते. त्यात अल्कोहोलचे प्रमाण कमी असल्याने माडीला मद्य गटातून वगळावे व तिच्या विक्रीला असलेली परवानापद्धत रद्द करण्यात यावी, अशी मागणीही केली आहे. 

कृषी व्यवसाय म्हणून मान्यता द्यावी

वास्तविक ताडीमाडी हा व्यवसाय शेतीशी निगडित  आहे. आपल्याच नारळ, सुपारीच्या बागेतील नारळाच्या झाडांपासून माडी काढली जाते. नारळ, सुपारीच्या बागा या शेतीव्यवसायात मोडत असल्याने माडी व्यवसायाला शेती व्यवसाय म्हणून मान्यता द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Check Also

‘सीकेटी‘त इतिहास विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय परिषद

विविध महाविद्यालये, विद्यापीठांतून 92 प्राध्यापक आणि संशोधकांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण …

Leave a Reply