Breaking News

तो पर्यंत संघर्षाची मशाल विझणार नाही !

१६ ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद आंदोलन 

पनवेल : रामप्रहर वृत्त
जो पर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले जात नाही, तो पर्यंत संघर्षाची मशाल विझणार नाही, असा ईशारा आज जासई येथे झालेल्या मशाल मोर्चातून राज्य सरकारला देण्यात आला. १५ ऑगस्ट हि डेडलाईन आहे, या तारखेपर्यंत राज्य सरकारने प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर दिबासाहेबांच्या जन्मभूमीत प्रज्वलित करण्यात आलेल्या या मशालीचे रूपांतर १६ ऑगस्टपासून क्रांतीच्या वणव्यामध्ये करण्याचा निर्धार यावेळी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी केला. 
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी ०९ ऑगस्ट अर्थात ऑगस्ट क्रांती दिनी जासई येथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने मशाल मोर्चा झाला.  नव्या मुंबईच्या निर्मितीसह देशातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी लोकनेते दि. बा. पाटीलसाहेब यांनी केलेला संघर्ष व त्याग लक्षात घेऊन आणि भूमिपुत्रांच्या अस्तित्वाची ओळख जपण्यासाठी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, ही मागणी समजून घेण्याऐवजी प्रकल्पग्रस्तांचा आवाज दाबण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. सरकारच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जन्मगावापासून ठाणे, रायगड, पालघर, नवी मुंबई, मुंबईसह विविध जिल्ह्यांतील गावागावात जासई येथून मशाल प्रज्वलित करून नेण्यात आली. तत्पूर्वी या ठिकाणी सर्व उपस्थितांनी महापुरुष, हुतात्म्यांना तसेच लोकनेते दि. बा. पाटील यांना वंदन करून या मोर्चाला सुरुवात केली. या मशाल मोर्चात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी खासदार जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी आमदार सुभाष भोईर, कॉम्रेड भूषण पाटील, ‘दिबां’चे पुत्र अतुल पाटील, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, जे. डी. तांडेल, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, गुलाब वझे, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, 27 गाव समितीचे नंदराज मुंगाजी, दशरथ भगत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, माजी जि. प. सदस्य राजेंद्र पाटील, पनवेल मनपाचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, अजय बहिरा, हरेश केणी, बबन मुकादम, विजय चिपळेकर, विकास घरत, शत्रुघ्न काकडे, अमर पाटील, प्रभाग समिती सभापती सुशीला घरत, नगरसेविका दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, ब्रिजेश पटेल, दिनेश खानावकर, उरण पंचायत समितीचे माजी सभापती नरेश घरत, वहाळच्या साई संस्थानचे संस्थापक रवी पाटील, कामगार नेते सुरेश पाटील, सरपंच संतोष घरत, अर्जुनबुवा चौधरी, राजेश गायकर, सीमा घरत, रूपेश धुमाळ, दीपक म्हात्रे यांच्यासह कृती समितीच्या विविध शाखांचे पदाधिकारी, विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी तसेच हजारो प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र सहभागी झाले होते. या वेळी दिवंगत गणपतराव देशमुख, मधुकर ठाकूर, माणिक जगताप, लक्ष्मणशेठ पाटील, मेघनाथ म्हात्रे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.       प्रकल्पग्रस्तांच्या एकतेची ताकद प्रचंड आहे, आणि ती सरकारला कळली सुद्धा आहे, मात्र नामकरणाचा एककलमी कार्यक्रम हाती घेऊन त्याचा घाट घालण्याचा प्रयत्न करताना  त्याची जाणीव झाली नव्हती. १० जून भव्य मानवी साखळी आणि २४ जूनच्या सिडको घेराव आंदोलनातून सरकारची भंबेरी उडाली आहे, मात्र झोपेचे सोंग घेत राज्य सरकार कारभार करत प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना डिवचण्याचे काम करीत असल्याचे दिसत आहे. मात्र खूप झाला अन्याय आता स्वस्थ बसायचं नाही, तर दिबांचे नाव आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय माघार घायची नाही, असा गर्भित ईशारा या प्रज्वलित मशालीच्या माध्यमातून देण्यात आला. त्यानुसार विमानतळाचे काम बंद करण्यासाठी सोमवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी ०९ वाजता ओवळे फाटा येथे जमणार भूमिपुत्र जमणार आहेत. 

दिबांच्या नावासाठी उभारलेले हे आंदोलन सर्वपक्षीय आहे. सर्व पक्षातील लोकांचा, संघटनांचा दिबांच्या नावासाठी आग्रह आणि वाढता पाठिंबा असून दिबांच्या नावाला पर्याय नाही. मात्र हे सरकार अजून हुतात्मा करण्याच्या प्रयत्नात आहेत. दिबांचे नाव लागण्यासाठी सरकारला काय पाहिजे आहे. भूमिपुत्राला न्याय देण्यासाठी लढा उभारला आहे, समाजाला न्याय मिळालाच पाहिजे. 
– दशरथ पाटील 

दिबासाहेबांचे नाव लागल्याशिवाय हि ज्योत थांबणार नाही. या मशाल मोर्चातून चेतावणी दिली आहे. आतापर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलने झाली, मात्र आता तसे होणार नाही १५ ऑगस्ट डेडलाईन दिली आहे तो पर्यंत सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद आला नाही तर जे काही होईल ते होऊ द्या दुसरी क्रांती झाली तरी चालेल १६ ऑगस्ट पासून विमानतळाचे सर्व काम बंद पाडू. लोकनेते दि. बा. पाटील यांचे विमानतळाला नाव आणि प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न निकाली लागेपर्यंत संघर्ष करत राहणार. 
– लोकनेते रामशेठ ठाकूर 

आपल्या सर्वांना दिबासाहेबांचा वारसा पुढे चालवायचा आहे. हि संघर्षाची, त्यागाची भूमि आहे. १६ जानेवारी १९८४ ला ऐतिहासिक लढा दिबासाहेबांच्या नेतृत्वाखाली झाला. आता १६ ऑगस्टला क्रांतीला पुन्हा सुरुवात होणार आहे. मशाल पेटली आहे राज्य सरकारने आता तरी जागे व्हावे कारण मागील दोन्ही आंदोलनापेक्षा आता होणारे आंदोलन मोठे असणार आहे.  दिबासाहेबांचे नाव विमानतळाला मिळेल त्या दिवशी भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळण्याची सुरुवात होईल. त्यामुळे आंदोलन कितीही वर्षे चालू द्या नाव मिळेपर्यंत संघर्षाचा लढा सुरूच राहील. 
– आमदार प्रशांत ठाकूर 

हा फक्त नावाचा नाही तर अस्मितेचा प्रश्न आहे. सरकारच्या छाताडावर बसून दिबांचे नाव लावून घेऊ. बाहेरच्या माणसाच्या बापाचे नाव नको. जो पर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत संघर्ष कायम राहील. 
– कॉम्रेड भूषण पाटील 

हा लढा एक दिवसाचा नाही, असे असले तरी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र सदैव तयार आहे. नाक दाबल्यावर तोंड उघडले जाते तसे सरकारचे नाक दाबण्याची वेळ आली आहे. मंत्री एकनाथ शिंदेनी ‘घी देखा है लेकिन बडगा नही देखा’ काळ आणि वेळ त्यांना दाखवून देईल.
– जगन्नाथ पाटील 


केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची जनआशीर्वाद यात्रा
केंद्रात नुकतेच मंत्री पद मिळाले भिवंडीचे खासदार कपिल पाटील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार आपल्या मंत्रालयाच्या कामकाजाची माहिती घेण्यासाठी १५ ऑगस्ट पर्यंत दिल्लीत थांबणार आहेत. त्यानंतर १६ आणि १७ तारखेला ते ठाणे आणि रायगड या ठिकाणी जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत. हुतात्म्यांचे आशीर्वाद घेण्याच्या अनुषंगाने त्याचबरोबर स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याच्या अनुषंगाने ही यात्रा काढण्यात येणार आहे. प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्याचे आयोजन सुद्धा करण्यात आले असल्याचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त पिंपरी-चिंचवडकर खासदार श्रीरंग बारणे …

Leave a Reply