Monday , February 6 2023

पनवेलमध्ये निघाली मशाल रॅली

पनवेल ः प्रतिनिधी
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे या मागणीसाठी सोमवारी उरण तालुक्यातील जासई येथे मशाल मोर्चा काढण्यात आल्यानंतर सायंकाळी पनवेल शहर परिसरात महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली दुचाकींवरून मशाल रॅली काढण्यात आली होती. या जनजागृतीपर रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लोकनेते दि. बा. पाटील यांच्या फोटोला पुष्पहार घालून सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मशाल मोर्चाला सुरुवात झाली. या वेळी बोलताना ते म्हणाले की, दि. बा. पाटीलसाहेबांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याबाबत सुरू असलेल्या राज्य सरकारच्या बालिशपणाला आणि उद्दामपणाला विरोध करण्यासाठी आज ही मशाल रॅली काढण्यात आली असून, या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. जासई येथील मोर्चातून आलेल्या मशालींची पनवेल महापालिका क्षेत्रात 40 ठिकाणी अशा प्रकारे रॅली काढण्यात आली आहे.
लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने ‘दिबां’च्या नावासाठी 15 ऑगस्ट ही डेडलाइन दिली असून या तारखेपर्यंत राज्य सरकारने प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर 16 तारखेला आपण पुन्हा ओवळे फाटा येथे जमून विमानतळाचे काम बंद पाडायचे आहे, असेही परेश ठाकूर यांनी सांगितले.
या रॅलीत नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, माजी नगरसेवक जगदिश गायकर तसेच अमरिष मोकल, चिन्मय समेळ, पवन सोनी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते. पनवेल शहरातील जय भारत नाका, मिरची गल्ली, कोळीवाडा, रोहिदास वाडा, पंचरत्न हॉटेल, आदर्श लॉज अशी फिरून आगरी समाज सभागृहाजवळ सर्वांनी प्रतिज्ञा घेऊन रॅलीची सांगता झाली. 

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply