Breaking News

सक्तीची निवृत्ती?

गेल्या वर्षी आपण एकही सामना न खेळल्यामुळे करारासाठी माझा विचार करू नये अशी विनंती धोनीने स्वत:च मंडळाच्या पदाधिकार्‍यांना केल्याचे सांगितले जाते. तसे असेल तर एका महानायकाची ही निवृत्तीच म्हणायला हवी. फक्त हा महानायक कुठलाही देखावा किंवा सत्कार समारंभाशिवाय शांतपणे रणांगणाबाहेर निघून गेला असे म्हणावे लागेल.

संपूर्ण कारकीर्द देदिप्यमान यशानिशी लखलखीत ठेवणार्‍या अजिंक्यवीराला नाइलाजाने सैन्यातून निवृत्त करण्याची वेळ आली की नाही म्हटले तरी राजाला जडच जाते. भारतीय क्रिकेटमधील अशाच एका महायोद्ध्याला अनिच्छेने मैदानाबाहेर ठेवण्याचा निर्णय यंदा घ्यावा लागला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आपले नवे करारनामे गुरुवारी जाहीर केले. त्यात माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा समावेश नाही. म्हणजेच यंदा देखील आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघात धोनी दिसणार नाही. गेले वर्षभर धोनीच्या संभाव्य निवृत्तीची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू होती. कसोटी क्रिकेटमधून धोनी केव्हाच निवृत्त झाला. परंतु एकदिवसीय सामन्यांमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली धोनी खेळताना दिसायचा. त्यालाही आता वर्ष उलटून गेले. कर्णधार पदाची सूत्रे कोहलीच्या हाती दिल्यानंतरही धोनी एका आधारस्तंभासारखा भारतीय संघात होता. यष्टीरक्षक म्हणून त्याची कामगिरी तरुणांना लाजवेल अशीच होती. त्याच्या दणकेबाज बॅटमधून पूर्वीसारखा धावांचा पाऊस पडत नसला तरी ऐन मोक्याच्या क्षणी तोच संघाचा तारणहार ठरत असे. त्याचे मैदानातले डावपेच, दांडगा अनुभव आणि खंबीर नेतृत्व भारतीय संघासाठी प्रेरणास्थान होते. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 साली ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषक पहिल्यांदा पटकावला. इतकेच नव्हे तर 2011 साली 50 षटकांच्या वन डे विश्वचषकावर देखील भारताने नाव कोरले. 90 कसोटी सामने, तब्बल 350 एकदिवसीय सामने आणि 98 ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यात धोनीने 17 हजारहून अधिक धावांचा खच पाडला. तसेच यष्टीमागे उभे राहून तब्बल 829 बळी टिपले. अशा नेत्रदीपक कामगिरीनंतर काहिसा थकलेला धोनी लवकरच निवृत्ती जाहीर करेल अशी अटकळ होती. परंतु त्याने निवृत्तीची घोषणा कधी केलीच नाही. गेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उपान्त्य फेरीतील सामन्यात न्यूझीलंडकडून भारताला हार पत्करावी लागली. त्या लढतीत धोनीच्या काहिशा संथ फलंदाजीवर क्रिकेट रसिकांनी नाराजी देखील प्रकट केली. त्या लढतीनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच राहिला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी करारबद्ध क्रिकेटपटूंची श्रेणीनिहाय यादी जाहीर केली आहे. गेल्या वर्षी धोनीचा समावेश वार्षिक पाच कोटी रूपये मानधन असलेल्या ‘अ’ श्रेणीत होता. ‘अ++’ या सर्वोच्च श्रेणीत खेळाडूंना वर्षाला सात कोटी मानधन दिले जाते. विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमरा हे या श्रेणीत मोडतात. वास्तविक हे तिघेही तालेवार क्रिकेटपटू धोनीच्याच तालमीत तयार झालेले आहेत. परंतु गेल्या वर्षभरात एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळणार्‍या धोनीला यंदा करारबद्ध करून घेण्याचे मंडळाने जाणीवपूर्वक टाळले. हे कधी ना कधीतरी घडणारच होते. चाळिशीच्या नजीक आलेला धोनी पूर्वीइतक्या तडफेने आंतरराष्ट्रीय स्तराचे क्रिकेट खेळू शकणार नाही याची कल्पना सर्वांना आहेच. तशी ती स्वत: धोनीला देखील असणारच. किंबहुना, म्हणूनच करारासंदर्भात धोनीला पूर्वकल्पना देण्यात आल्याचा खुलासा मंडळाने आर्वजून केला आहे.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply