मंदिरात पायात काळे मोजे घालून गणपती बाप्पाला साकडे..
![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2019/04/IMG-20190413-WA0120-1024x989.jpg)
कर्जत : बातमीदार
अनेक कारणांनी सतत सोशल मीडियावर चर्चेत राहिलेले मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ अजित पवार हे आता आणखी एका फोटोमुळे पुन्हा सोशल मीडियासाठी चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. शुक्रवारी (दि. 12) कर्जत तालुका दौर्यावर प्रचारासाठी असताना पार्थ पवार हे कशेळे येथील संवाद सभा उरकून आपल्या शेवटच्या सभेसाठी रात्री साडेआठच्या सुमारास खांडपे येथे जाण्यास निघाले. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अशोक भोपतराव यांच्या कडाव गावात थांबविण्यात आले. तेथे असलेल्या श्री बालदिगंबर गणेश मंदिरात पार्थ पवार बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गेले. तेथे त्यांनी गणेशाच्या मूर्तीला पुष्पहार घातला आणि ते आपल्या शेवटच्या सभेसाठी निघून गेले.
मात्र 13 एप्रिल रोजी पार्थ पवार यांनी काळ्या रंगाचे बूट पायात असताना श्री गणेशाच्या मूर्तीला पुष्पहार घातला असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र पार्थ पवार यांच्या पायात बूट नव्हते तर नायके कंपनीचे कट सॉक्स होते, ही भूमिका पटवून देण्यात राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर शेकाप, राष्ट्रीय काँग्रेस तसेच आघाडीतील मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर उत्तरे देताना नाकीनऊ आले आहेत.
विरोधकांनी तो फोटो सर्वत्र व्हायरल केला असल्याचा आरोप आघाडीचे कार्यकर्ते करीत आहेत. मात्र पार्थ पवार कडाव येथील गणेश मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलेले असताना त्यांचे फोटो हे तेथे उपस्थित असलेल्या आघाडीच्या उत्साही कार्यकर्त्यांनीच काढले असतील, हे तेवढेच खरे आहे. पण तो फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर होणारे परिणाम यांची चिंता न केल्याने आता पार्थ पवार यांना गणेश भक्तांचा रोष ओढवून घ्यावा लागत आहे.