महापौर कविता चौतमोल यांचे उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात गौरवोद्गार
पनवेल ः रामप्रहर वृत्त
सामाजिक कार्यकर्ते कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे. समाजासाठी काम करणारे सर्वांसाठी समान असतात. ही मंडळी दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम करतात, यातून समाजात एक चांगला संदेश जातो, असे गौरवोद्गार महापौर कविता चौतमोल यांनी काढले.
पनवेलमधील उत्तर भारतीय सामाजिक प्रतिष्ठानतर्फे रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम व हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (दि. 10) करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. आंध्र कला समिती हॉल सेक्टर-2 येथे हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर कविता किशोर चौतमोल यांच्या हस्ते भगवान श्रीरामाच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. महापौर कविता चौतमोल यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सी. पी. यांनी सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या वेळी समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्यांचा महापौरांच्या हस्ते सन्मानपत्र, चषक देऊन गौरव करण्यात आला. त्यात प्रामुख्याने रुपाली शिंदे, संध्या चौहान, प्रदीप ठाकरे, सुशील मोरे, ओमप्रकाश प्रजापती, सुनील सिन्हा आणि श्रीकांत दुबे आदींचा समावेश आहे. कार्यक्रमात महिला व मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. गुरू कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हळदी- कुंकू, विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. खेळांमध्ये सहभागी झालेल्या महिला, मुलांनाही बक्षीस देण्यात आली. बनारसी साडी सुनंदा पवार, अनु ठाकूर, पिंकी शर्मा, शालिनी ठाकरे आणि सावित्री मौर्य यांनी पटकावली.
कार्यक्रमात सुनील सिन्हा आणि रवी नाईक यांनी आपल्या गायनाने उपस्थितांचे मनोरंजन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रामुख्याने सी. पी. प्रजापती, श्रीकांत दुबे, संगीता कुमारी, पूनम प्रजापती, सत्यनारायण शर्मा, विनोद शर्मा, प्रयाग साह, रवींद्र प्रजापती, जयप्रकाश जैस्वाल, विनोद सिंग व राजनाथ पासवान आदींनी सहकार्य केले.