Breaking News

अलिबाग ः ग्रामपंचायत सदस्यपदासाठी 91 अर्ज; कोप्रोली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार

अलिबाग ः प्रतिनिधी

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अलिबाग तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या सदस्य पदासाठी 91 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सरपंच पदासाठी वेश्वी आणि नवेदर नवगावमध्ये प्रत्येकी पाच अर्ज आले आहेत. कोप्रोली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर सर्वपक्षीय बहिष्कार असून  सरपंचपदासाठी एकही अर्ज आलेला नाही. ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यासाठी 16 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. अलिबाग तालुक्यातील वेश्वी, कोप्रोली व नवेदर नवगाव या तीन ग्रामपंचायतींचा समावेश आहे. मंगळवारी (दि. 27) उमेदवारी अर्ज भारण्याचा शेवटचा दिवस होता. अलिबाग शहरापासून जवळच असलेल्या वेश्वी ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी पाच उमेदवारी अर्ज आले आहेत, तर सदस्य पदाच्या 11 जागांसाठी 45 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. नवेदर नवगाव ग्रामपंचायत निवडणुकीत जातपडताळणी प्रमाणपत्रांची समस्या असल्याने तेथे गेली अनेक वर्षे निवडणूकच झाली नव्हती. गेली 12 वर्षे तेथे प्रशासकाचा कारभार चालतो आहे, परंतु या वेळी शेकाप विरूद्ध शिवसेना शिंदे गट अशी सरळ लढत पहायला मिळणार आहे. सरपंचपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव असून त्यासाठी पाच अर्ज आले आहेत. सदस्यपदाच्या 11 जागांसाठी 45 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अनुसूचित जमातीच्या जातपडताळणी प्रमाणपत्र ग्राह्य धरले जात नसल्याच्या मुद्यावर कोप्रोली ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर या वेळीही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरपंच पदासाठी एकही उमेदवारी अर्ज आलेला नाही. सदस्यपदाच्या नऊ जागा असून त्यात एका जागेसाठी एकमेव अर्ज दाखल झाला आहे. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी विजयासाठी कंबर कसली आहे. आता जनतेचा कौल कोणाला मिळातो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply