Breaking News

पंतप्रधान मोदींकडून स्वातंत्र्य दिनाची भेट; देशासाठी 100 लाख कोटींच्या योजना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पंतप्रधान मोदींनी देशाच्या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवून रविवारी अनेक घोषणा केल्या. यामध्ये देशाच्या विकासासाठी आधुनिक पायाभूत सुविधांवर भर दिला. ‘प्रधानमंत्री गतिशक्ती योजने’ची घोषणा केली आहे. ही योजना 100 लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक मोठी असणार आहे. लाखो लोकांना रोजगार देण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. मोदींनी सांगितल्यानुसार ही योजना लवकरच आणली जाणार असून ती देशासाठी मास्टर प्लॅन ठरेल, असेही या वेळी ते म्हणाले. पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना संबोधित करताना अनेक मुद्द्यांवर भूमिका मांडली. यामध्ये कोरोनापासून देशातील क्रीडा क्षेत्र, तसेच उद्योग क्षेत्राविषयीदेखील त्यांनी मत मांडले. देशभरातील मुलींसाठी पंतप्रधानांनी एक मोठी घोषणा केली आहे. प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेमध्ये 100 लाख कोटी रुपयांहून अधिकच्या योजनांमुळे तरुणांसाठी रोजगाराच्या हजारो संधी निर्माण होतील. पंतप्रधान गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन हा औद्योगिक उलाढालीला चालना देणे आणि वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करणारा असेल. भारतात विकास यात्रेची आता सुरुवात करून, पुढील 25 वर्षांचा प्रवास हा नवीन भारताच्या निर्मितीचा अमृत काळ आहे. या अमृत काळात आमच्या संकल्पांची पूर्तता आपल्याला स्वातंत्र्याच्या 100 वर्षांपर्यंत घेऊन जाईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. खेळांमध्ये प्रतिभा, तंत्रज्ञान आणि व्यावसायिकता आणण्यासाठी सुरू असलेली मोहीम अधिक तीव्र आणि व्यापक करावी लागेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. देशांमध्ये ज्या नीती बनल्या त्या छोट्या शेतकर्‍यांना केंद्रस्थानी ठेवून बनल्या नाहीत. त्यामुळे त्यांना लक्षात घेऊन एक निर्णय घेतला जाणार आहे. छोटा शेतकरी देशाचा अभिमान बनावा, असा आपला संकल्प असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. देशात आठ कोटींहून अधिक गावांतील महिला बचत गटांशी जुळल्या आहेत आणि त्या एकहून अधिक उत्पादनांची निर्मिती करतात. त्यांच्या उत्पादनांना देशात आणि विदेशात मोठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सरकार आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म तयार करेल, अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली.

नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन

ग्रीन हायड्रोजनचे जागतिक केंद्र आणि सर्वांत मोठा निर्यातदार बनण्यासाठी राष्ट्रीय हायड्रोजन मिशनची स्थापना करण्याची घोषणा मोदींनी केली. स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी देश ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी झाला पाहिजे, असा संकल्प पंतप्रधान मोदींनी केला आहे. देश अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात वेगाने वाटचाल करत आहे आणि या क्षेत्रातील ऊर्जा क्षमता एक लाख मेगावॅटच्या वर गेली आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. देशाने 2022 पर्यंत 1,75,000 मेगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता गाठण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे, असे मोदींनी सांगितले.

सैनिकी शाळांमध्ये मुलींनाही मिळणार प्रवेश

सर्व सैनिकी शाळांची कवाडे आता मुलींसाठीही उघण्यात येतील. देशात सध्या 33 सैनिकी शाळा आहेत. अडीच वर्षांपूर्वी मिझोराममध्ये मुलींना सैनिकी शाळेत प्रवेश देण्याचा प्रयोग केला गेला. आता देशातील सर्व सैनिकी शाळांची कवाडे मुलींसाठी खुली केली जातील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

2024पर्यंत रेशन दुकानांवर पौष्टिक तांदूळ

सरकार कुपोषणाच्या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. याअंतर्गत मध्यान्ह भोजन यासारख्या विविध योजनांद्वारे गरिबांना वितरित करण्यात येणारा तांदूळ पौष्टिक (फोर्टिफाइड) केला जाईल. 2024 पर्यंत प्रत्येक योजनेद्वारे दिला जाणारा तांदूळ हा पौष्टिक केला जाईल.

75 वंदे भारत ट्रेन

देशात 75 आठवड्यांच्या आत 75 वंदे भारत ट्रेन चालवल्या जातील, अशी घोषणा मोदींनी केली. या ट्रेन देशाच्या कानाकोपर्‍याला जोडतील. ज्या वेगाने नवीन विमानतळे बांधली जात आहेत व उड्डाण योजना दुर्गम भागांना हवाई मार्गाने जोडत आहे, तीदेखील अभूतपूर्व आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply