रायगड लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे हे दोन तुल्यबळ उमेदवार पुन्हा आमनेसामने आहेत. रायगडचे राजकारण कधी कुठले वळण घेईल याचा नेम नसतो. म्हणूनच येथील निवडणुका रंगतदार होत असतात. गीते वि. तटकरे थेट लढतीत यंदा अनेक छटा दिसून येतात.
रायगड लोकसभा मतदारसंघ पूर्वी कुलाबा या नावाने ओळखला जात असे. या मतदारसंघात काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व होते. सन 2009च्या पुनर्रचनेत रायगड जिल्ह्यातील पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर असे सहा विधानसभा मतदारसंघ मिळून लोकसभा मतदारसंघाची बांधणी करण्यात आली. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलली. परिणामी शेकापने उमेदवार उभा न करता शिवसेनेचे अनंत गीते यांना पाठिंबा दिला. त्या वेळी बॅ. ए. आर. अंतुलेंविरुद्ध गीते रायगडमधून पहिल्यांदा निवडून आले होते. त्यानंतर मात्र शेकाप आणि शिवसेनेत वितुष्ट निर्माण होऊन 2014मध्ये शेकापने निवडणूक लढविली. राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांना पक्षात घेत शेकापने त्यांना लोकसभेचे तिकीट दिले. दुसरीकडे, राष्ट्रवादीने हा मतदारसंघ काँग्रेसकडून घेऊन सुनील तटकरेंना रिंगणात उतरविले. या तिरंगी लढतीत गीतेंनीच बाजी मारली.
रायगड लोकसभा मतदारसंघातील सहापैकी अवघा महाड हा एकमेव विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. तरीही रायगड शिवसेनेने 2009पासून आपल्याकडे राखला आहे. यंदा अनंत गीतेंच्या विरोधात सुनील तटकरे पुन्हा मैदानात असून, शेकापने तटकरेंना पाठिंबा दिला आहे. याच शेकापचे सर्वेसर्वा जयंत पाटील यांनी गेल्या वेळी तटकरेंच्या भ्रष्टाचाराची श्वेतपत्रिका काढून त्यांना गाडण्याची भाषा केली होती. आता ही मंडळी तटकरेंसाठी मतांचा जोगवा मागत आहेत. एकेकाळी जिल्ह्यात प्रबळ असलेली आणि तटकरेंमुळे वारंवार पराभव पदरी आल्याचा आरोप करणारी काँग्रेसदेखील नाईलाजाने का होईना, पण महाआघाडीत सहभागी झाली आहे. मनसेची यात अनाहुत भर पडली. एवढे पक्ष एकत्र आल्याने महाआघाडी विजयाचा दावा करीत असली, तरी हा सामना एकतर्फी नक्कीच नाही. याला अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे राष्ट्रवादी, शेकाप आणि काँग्रेसचे नेते आपापसातील हाडवैर विसरून एकत्र आले खरे, मात्र शेकाप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते जुन्या घडामोडी विसरलेले नाहीत. ते पाहता महाआघाडीतील मतदान फुटण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
महाआघाडीकडून उमेदवारी लढविणार्या राष्ट्रवादीकडे दुसर्या फळीतील नेत्यांचा अभाव आहे. तटकरेंचे एकेकाळी सहकारी राहिलेले महेंद्र दळवी, अॅड. राजीव साबळे, श्याम भोकरे, समीर शेडगे, प्रकाश देसाई सध्या शिवसेनेत आहेत; तर अॅड. महेश मोहिते भाजपकडे आकर्षिले गेले. याखेरीज काँग्रेसचे माजी मंत्री रवीशेठ पाटील यांनीही ‘कमळ’ हाती घेऊन महायुतीसाठी प्रचार करीत आहेत. आणखी एक बाब म्हणजे सुनील तटकरे यांचा मुलगा आमदार अनिकेत, मुलगी जिल्हा परिषद अध्यक्ष आदिती वडिलांचा जोरदार प्रचार करीत असताना, बंधू माजी आमदार अनिल तटकरे आणि पुतण्या आमदार अवधूत तटकरे हे पिता-पुत्र मात्र प्रचारात दिसत नाहीत. लोकसभा निवडणुकीचा काय निकाल लागतोय हे पाहून नंतर पुढील राजकीय वाटचालीविषयी ठरवू या ‘वेट अॅण्ड वॉच’च्या भूमिकेत ते कदाचित असतील, परंतु त्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवते.
रायगडात नामसाधर्म्य असलेल्या उमेदवाराला निवडणूक रिंगणात उतरविण्याची परंपरा आहे. सुनील तटकरे यांच्या नावाशी साधर्म्य असलेले आणखी दोघे या वेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुनील श्याम तटकरे या अपक्ष उमेदवाराला 9,849 मते मिळाली होती, तर राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचा 2110 मतांनी पराभव झाला. या वेळी तर दोन अपक्ष तटकरे निवडणूक लढवत आहेत. हे उमेदवार तटकरेंसाठी नुकसानदायी ठरू शकतात.
आतापर्यंत एकदाही पराभूत न झालेले शिवसेना नेते अनंत गीते यंदा सलग सातव्यांदा लोकसभेच्या रणांगणात आहेत. महाआघाडीचे चक्रव्यूह भेदण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे. यासाठी ते जिकिरीने लढत असून, भाजप व रिपाइं त्यांच्या जोडीला आहे. चुरशीची लढत लक्षात घेऊन गीते हे विरोधकांशी थेट भिडत आहेत, तर कुठे गनिमी काव्याचा अवलंब करीत आहेत. सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न करून मुस्लीम समाजालाही त्यांनी साद घातली आहे.
रायगड मतदारसंघात जात फॅक्टर महत्त्वाचा मानला जातो. इथे कुणबी मतांचे प्राबल्य आहे. याशिवाय मुस्लीम, अनुसूचित जाती व जमातींचा प्रभाव आहे. खुला प्रवर्ग आणि इतर मागास वर्गातील लोकही चांगल्या संख्येने आहेत. या सर्व मतांची मोट बांधण्याचा उभय उमेदवारांचा प्रयत्न असेल.
छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या रायगडात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनंत गीते आणि सुनील तटकरे यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. त्यामुळेच ही निवडणूक रंगतदार बनली आहे. -समाधान पाटील (9004175065)