Breaking News

संभाजीराजेंनी नाकारले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पत्र

मराठा आरक्षण आंदोलनात राज्य सरकारवर टीका

नांदेड ः प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कोल्हापूर आणि नाशिकनंतर आता खासदार संभाजीराजे भोसले यांनी नांदेडमधून पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. नांदेडमध्ये जमलेल्या मराठा आंदोलकांसमोर बोलताना संभाजीराजे यांनी शुक्रवारी (दि. 20) राज्य सरकारवर आणि विशेषत: मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडले. या वेळी राज्य सरकारने पाठवलेले 15 पानांचे पत्रदेखील आपण स्वीकारत नसल्याचे संभाजीराजेंनी सांगितले.
समाजाला दिशाहीन करणे हे चालणार नाही. त्यासाठी संभाजीराजे छत्रपती इथे बसला आहे. मला एक पत्र आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 15 पानी पत्र पाठवलेय. त्यात समाजासाठी काय काय करतोय हे लिहिलंय. त्यांनी आंदोलनाची दखल घेतली, पण या 15 पानी पत्रामध्ये अनेक तफावती आहेत, असे संभाजीराजे म्हणाले.
पहिले मूक आंदोलन कोल्हापूरला झाले, दुसरे नाशिकला झाले. तिथे तुमच्याइतकी गर्दी नव्हती. नांदेडकरांचा नाद करू शकत नाही. पहिल्या दोन्ही आंदोलनालाही लोकप्रतिनिधी आले. आजही खासदार-आमदार आलेत. मग तुमचे पालकमंत्री कुठे आहेत? तुम्हाला जर प्रामाणिकपणे हे पत्र द्यायचे होते तर पालकमंत्र्यांच्या हातून द्यायचे होते. ते मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे आम्ही हे पत्र स्वीकारत नाही, असे संभाजीराजेंनी स्पष्ट केले.
मला हे पत्र पटत नाही. 15 जुलैला राज्य सरकारचा एक जीआर निघाला. सरकारने सांगितले की ज्यांना 2014पासून कोविडच्या संकटापर्यंत ज्यांना नियुक्त्या दिल्या आहेत त्यांना रुजू करून घ्या. समाजाचे लोक खूश झाले. लोक अधिकार्‍यांकडे गेले की म्हणतात, तुमचे आरक्षण रद्द झालेय, तुम्हाला नोकरी कशी द्यायची. मग हा जीआर काढून काय फायदा? सरकार या बाबतीत झोपलेय का? त्या जीआरचा काय फायदा? ज्यांची निवड झाली, पण त्यांना अजून नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. त्या मुलांवर अन्याय चालणार नाही. या पत्रात तुम्ही यावर काही लिहिलेय का? या गरीब मराठ्यांची काय चूक आहे? असा सवाल संभाजीराजेंनी केला.
14-15 ऑगस्टला 23 वसतिगृहांचे उद्घाटन करणार असे अशोक चव्हाण म्हणाले. 15 ऑगस्टला एकनाथ शिंदेंनी एक वसतिगृह सुरू करून त्याचे उद्घाटन केले. या 23पैकी मागच्या सरकारने बरेच केले आहेत. नाशिक, कोल्हापूर, बीड, पुणे हे वसतिगृह मागच्या सरकारनेच केले आहेत. मग तुम्ही काय केले? तुम्ही काही केले नाही म्हणून तुम्ही इथे आले नाहीत, असे आम्ही समजायचे का? अशा शब्दांत संभाजीराजेंनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply