पेण : प्रतिनिधी
पेण नगर परिषदेसह राज्यातील सर्व 227 नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीचा कालावधी डिसेंबर 2021 या महिन्यात संपत असल्याने निवडणुकीचा बिगूल अखेर वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषदेला प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करणे, प्रारूप वॉर्ड रचनेची कार्यवाही सुरू करण्याची सूचनाही दिली आहे.
नगर परिषद, नगर पंचायतीची मुदत डिसेंबर 2021- फेब्रुवारी 2022 मध्ये संपत आहेत. अशा नगर परिषद, नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून वॉर्डरचनेचा प्रारूप कच्चा आराखडा तयार करण्यात यावा, प्रभाग रचना पद्धतीत बदल करण्यात आला असून एक वॉर्ड हा प्रभाग समजला जाईल. हा आराखडा तयार करीत असताना भौगोलिक बदल, नद्या, नाले नवीन रस्ते, पूल, इमारती इत्यादी विचारात घ्यावे, नगर परिषद, नगरपंचायत अधिसूचनेद्वारे त्याचे क्षेत्र निश्चित करून नकाशे तयार करावेत, आराखडा तयार करण्याची कार्यवाही तत्काळ म्हणजे 23 ऑगस्ट रोजी सुरू करावी. कच्चा आराखडा तयार केल्यानंतर तत्काळ तो आराखडा निवडणूक आयोगाला ई-मेल द्वारे कळविण्यात यावा, तयार केलेल्या कच्च्या आराखड्याबाबतची गोपनीयता पाळण्यात यावी.
यापूर्वीच्या निवडणुका प्रभाग पद्धतीने झाल्या होत्या म्हणजेच चार वार्ड मिळून एक प्रभाग तयार करण्यात येत होता, परंतु आता ही पद्धत बंद करण्यात येऊन एका वॉर्डात एकच उमेदवार असणार आहे. वॉर्डामधील उभा राहणार्या एकाच उमेदवाराला एकच मत मतदारांना टाकता येणार आहे. एकपेक्षा जास्त मते टाकण्याची पद्धत आता बंद करण्यात आली आहे.
नगर परिषदेच्या प्रभाग रचनेबाबत आराखडा बनविण्याची सूचना निवडणूक आयोगाकडून आली असून 23 ऑगस्टपासून या कामाला सुरुवात होणार आहे. पेणमधील भौगलिक परिस्थितीनुसार प्रभाग रचनेनुसार आराखडा बनवून तो निवडणूक आयोगाकडे पाठविला जाईल.
-जीवन पाटील, मुख्याधिकारी