Breaking News

दरडग्रस्त व पूरग्रस्त गावांचा तज्ज्ञांमार्फत अहवाल तयार करणार -मेधा पाटकर

पोलादपूर : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर आणि महाड तालुक्यातील ज्या गावांना अतिवृष्टीमुळे दरडग्रस्त व पूरग्रस्त होऊन आर्थिक नुकसान, पशूधन व जीवितहानी सोसावी लागली, त्या सर्व गावांचा तज्ज्ञांमार्फत अहवाल करून राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधणार असल्याची ग्वाही जनआंदोलनच्या राष्ट्रीय समन्वय अध्यक्षा मेधा पाटकर यांनी दिली.

महाड तालुक्यातील तळीये गावात जुलैमध्ये झालेल्या भूस्खलनात दरडीखाली गाडलेल्या घरांची पाहणी करण्यासाठी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वय अध्यक्षा मेधा पाटकर यांनी भेट दिली. या वेळी युसूफ मेहेरअली सेंटरच्या विजया चौहान व नितीन अणेराव, गुड्डी, मुंबईच्या सुनीती सुरव, राष्ट्रसेवा दल मुंबई सीरत सातपुते, तसेच कार्यकर्ते विलास पिरोटे, इब्राहिम खान, मनीष देशपांडे, अस्लम बागवान, प्रशांत गावंड, अजय भोसले, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे रायगड अध्यक्ष शैलेश पालकर, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन दारूबंदी कार्यकर्ते अब्दुल हक खलफे आदींनी एकाच वेळी बाधित कुटुंबातील लोकांना कशाप्रकारे मदत करता येईल, याबाबत आढावा घेतला.

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर व महाड येथील पुरस्थिती व दरडप्रवण क्षेत्रातील भौगोलिक परिस्थिती व पर्जन्यमान याबाबत सविस्तर तज्ज्ञ मंडळींकडून अहवाल तयार करून शासनाला सादर करण्यात येईल. तळीये गावातील दरडग्रस्तांसाठी पुनर्वसन घरकुले बांधताना तीन गुंठे जमिनीवर तीनशे चौरस फुटांचे घरकुल बांधून देण्याची म्हाडाची भूमिका बाधित कुटुंबांना अमान्य असल्याने सामाजिक आणि शासन अनुदान यांच्या समन्वयातून किमान एक हजार चौरस फूट क्षेत्रफळाचे घर उपलब्ध करून देण्याबाबत आग्रही असल्याचे मेधाताईंनी सांगितले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply