राज्य सरकारने दहीहंडीला परवानगी नाकारली
मुंबई ः प्रतिनिधी
मुंबईसह महाराष्ट्रामध्ये दहीहंडी आयोजित करण्याला राज्य सरकारने सलग दुसर्या वर्षी परवानगी नाकारली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींसोबत सोमवारी (दि. 23) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेऊन हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे दहीहंडी मंडळांसह गोविंदांचा हिरमोड झाला आहे.
कोरोनामुळे मागील वर्षी मुंबई, ठाण्यासह राज्यभरातील दहीहंडी पथकांनी उत्सव साजरा केला नव्हता. यंदा छोट्या प्रमाणात का असेना उत्सवाला परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. जागेवरच मानाची हंडी फोडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी समन्वय समितीने प्रशासनाकडे केली तसेच सर्व गोविंदांना लसीचे दोन डोस पूर्ण करणार आणि सुरक्षित दहीहंडी उत्सवाची जबाबदारी आमची असेल, असे या बैठकीमध्ये समन्वय समितीने राज्य सरकारला सांगितले, मात्र तरीही सरकारने परवानगी नाकारली.
दहीहंडी साजरी केल्याने जास्त मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रभाव वाढू शकतो, असे टास्क फोर्सने सांगितले असल्याचे राज्य सरकारकडून या वेळी स्पष्ट करण्यात आले. त्यावर हा उत्सव जागतिक स्तरावर टीकावा, अशी बाजू समन्वय समितीने मांडली. गणेशोत्सवाप्रमाणे नियम आखण्याची मागणीही समितीने केली, मात्र बैठकीला उपस्थित असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परवानगी देऊ शकत नाही, असे सांगितले.
दरम्यान, एका महिन्यापूर्वीच मनसेने दहीहंडी जल्लोषात साजरी करण्याचा निर्धार केला आहे. यंदा 31 ऑगस्ट रोजी विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार असल्याचे मनसेकडून अभिजित पानसे यांनी फेसबुक पोस्ट करून जाहीर केले आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनीही यंदा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. दहीहंडी होणारच.. घरात बसून सबुरीचे सल्ले आम्हाला नकोत.. बार उघडता, त्यांना नियम लावता आणि हिंदू सणांना मात्र विरोध? आम्ही दहीहंडी साजरी करणारच, असे ट्विटदेखील कदम यांनी केले आहे.
‘पारंपरिक दहीदंडीला परवानगी द्या’
मुंबई ः काही गणेशोत्सव मंडळांनी कोरोना काळात ज्या पद्धतीने नियम पाळून उत्सवाची परंपरा कायम ठेवली त्याच पद्धतीने दहीदंडी उत्सवाची परंपरा अखंड रहावी म्हणून पारंपरिक पद्धतीने दहिदंडी साजरी करण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केली आहे.