ना. नारायण राणेंचे शिवसेनेला प्रत्युत्तर
मुंबई ः प्रतिनिधी
तुम्ही कुणी माझे काही करू शकत नाही. तुमच्या कोणत्याही प्रक्रियेला मी घाबरत नाही. तुम्हाला सर्वांना आतापर्यंत मी पुरून उरलो आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बुधवारी (दि. 25) भरगच्च पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.
ना. नारायण राणेंना मंगळवारी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान रत्नागिरी पोलिसांनी संगमेश्वर येेथून पोलिसांनी ताब्यात घेतले. महाडमध्ये त्यांना अटक झाली, मात्र काही वेळातच न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला. त्यानंतर बुधवारी मुंबई उच्च न्यायालयानेही ना. राणेंना दिलासा दिला आहे. 17 सप्टेंबरपर्यंत पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही अशी ग्वाही राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. या पार्श्वभूमीवर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप नेते आमदार आशिष शेलार आदी सोबत होते.
दोन्ही निकाल माझ्या बाजून लागले आहेत. देशात अजूनही देशात कायद्याचे राज्य आहे हे दिसून येते. जनआशीर्वाद यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे. आता दोन दिवस विश्रांती घेत परवापासून सिंधुदुर्गातून यात्रेला सुरुवात होईल. त्यामध्ये व्यत्यय पडणार नाही, असे ना. नारायण राणे यांनी सांगितले. भाजप माझ्यामागे खंबीरपणे उभा राहिला त्यासाठी नड्डा साहेब, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, बाकी खासदार, आमदार सर्वांचे मला पाठबळ मिळाले. मी त्यांचा आभारी आहे, असे ना. राणे म्हणाले.
भूतकाळामध्ये एखादी गोष्ट घडली आणि त्याची माहिती दिली तो कसा गुन्हा होतो, असा प्रश्न ना. राणे यांनी उपस्थित केला. ज्यांना देशाबद्दल अभिमान नसतो त्यांना राष्ट्रीय सण माहिती नसतात. देशाबद्दल अभिमान आहे म्हणून सहन झाले नाही. म्हणून जे आज बोललो ते रेकॉर्डवर आहे, असे ना. राणेंनी सांगितले. सेना भवनबद्दल अशी कोण भाषा करेल त्याचे थोबाड तोडा असा आदेश दिले. हा क्राईम नाही. कलम 120 अंतर्गत गुन्हा होत नाही का? हा योगी आहे की ढोंगी चपल्लांनी मारले पाहिजे, असेही ते म्हणाले होते. पवार साहेब, मुख्यमंत्री केलेत त्याचा सुसंस्कृतपणा बघा, असा टोला ना. राणेंनी लगावला.
शिवसेना वाढली त्यात माझा मोठा सहभाग आहे. तेव्हा आताचे कुणी नव्हते. अपशब्द बोलणारेही नव्हते. कुठे काय करीत होते माहिती नाही. पोलिसांनी जे करायचे आहे ते केले. तुम्हाला घरे नाहीत? मुलेबाळे नाहीत? आठवणीत ठेवा, असा इशाराही या वेळी ना. राणे यांनी दिला.