Breaking News

ओवळे विभागातील शेकापच्या कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त
राजकारणाचा आधार घेऊन गांधी परिवाराचे नाव प्रकल्पांना देतात, मात्र ज्यांनी गोरगरिबांसाठी संघर्ष केला, भूमिपुत्रांना न्याय मिळवून दिला अशा थोर संघर्षमूर्ती दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यास महाराष्ट्र सरकार का विरोध करीत आहे हे ठाकरे सरकारने जाहीर करावे, असे सवालवजा आव्हान राज्याचे माजी शिक्षणमंत्री तथा भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी बुधवारी (दि. 25) येथे दिले.
ओवळे विभागातील शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते तथा 27 गाव समिती कार्याध्यक्ष सुनीलशेठ म्हात्रे, ज्येष्ठ कार्यकर्ते गजानन म्हात्रे, तुकाराम म्हात्रे, संतोष म्हात्रे यांच्यासह महिला मंडळ, ज्येष्ठ, महिला, युवक शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. पनवेल शहरातील मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात हा पक्षप्रवेश सोहळा भाजप नेते आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्या वेळी कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना आमदार शेलार बोलत होते.
या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, मराठा समाजाचे नेते विनोद साबळे, पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत, ज्येष्ठ नेते के. ए. म्हात्रे, सुभाष म्हात्रे, कर्णा शेलार, तालुका चिटणीस प्रल्हाद म्हात्रे, सुनील पाटील, तुळशीराम घरत, विश्वनाथ घरत, संदीप घरत, रमेश पाटील, राकेश गायकवाड आदी उपस्थित होते.
भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी पुढे बोलताना भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कासाठी दि. बा. पाटील यांनी आपले आयुष्य वेचले, अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष केला. त्यांचेच नाव नवी मुंबई विमानतळाला लागले पाहिजे, असे सांगतानाच यासाठी उभारण्यात आलेल्या लढ्याचे कौतुक करत हा मतांचा संघर्ष नाही तर भूमिपुत्रांच्या अस्मितेसाठी संघर्ष असून ‘दिबां’चे नाव विमानतळाला लागलेच पाहिजे आणि त्यासाठी तसूभर मागे हटणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला.
सिडकोचे अध्यक्ष असताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथील समस्या, नागरिकांचे प्रश्न, भूमिपुत्रांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. कुठल्याही दलालाला तिथे थारा नव्हता, पण आता विमानतळाचे काम सुरू असताना या कामाचे टेंडर मुंबईतील निर्मल इमारतीत ठरते आणि दलाली ठरल्यानंतर वैभव चेंबरमध्ये कन्फर्मेशन ऑर्डर निघते, असा राज्य सरकारचा कारभार सुरू असल्याचा आरोप आमदार शेलार यांनी केला.
देशाचा गौरव दिन असलेला स्वातंत्र्य दिन देशातील प्रत्येक नागरिकाला ज्ञात आहे, मात्र राज्याचे नेतृत्व करणार्‍या मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्य दिनाचा हीरक की अमृतमहोत्सव माहीत नाही. याची त्यांना लाज वाटली पाहिजे, असे आमदार शेलार म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी मोठी चूक करायची आणि या संदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. यात ना. राणे यांचा गुन्हा काय आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी हे पक्ष घराणेशाहीवर चालणारे पक्ष आहेत, तर भाजप लोकशाहीच्या मूल्यांवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे चहा विकणार्‍या कुटुंबातील सामान्य व्यक्ती देशाचे पंतप्रधान झाले आहेत. या पक्षात सामान्य कार्यकर्त्यालाही संधी मिळते. त्यामुळे सुनील म्हात्रे, गजानन म्हात्रे व सहकार्‍यांना येथे मोठी संधी असल्याचे सांगून कधी काळी शेकाप शेतकर्‍यांचे प्रश्न मांडत होता, आता तोपण उरला नाही, असे आमदार शेलार यांनी नमूद केले.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करीत असून या पक्षात सर्व कार्यकर्त्यांना मान-सन्मान आणि काम करण्याची संधी मिळते. आज आम्ही 70व्या वर्षीही समाजसेवा करीत आहोत. त्यासाठी कार्यकर्त्यांची ताकद मिळत आहे आणि त्यातून आम्हाला कार्य करण्याची ऊर्जा मिळते.
आमदार महेश बालदी गुपचूप काही करीत नाही. खुले चॅलेंज देऊन करतात. त्यामुळे किमान पुढील पाच निवडणुका ते जिंकणार असे सूतोवाच करताना आमदार महेश बालदी भाजपचा वजनदार नेता असल्याचे सांगत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्याप्रती अभिमान व्यक्त केला.
आमदार महेश बालदी यांनी सांगितले कि, विमानतळाला ‘दिबा‘साहेबांचे नाव लावण्यास शेकापने विरोध केला. त्या वेळी सुनील म्हात्रे व सहकार्‍यांना शेकापविरुद्ध चीड निर्माण झाली आणि तेथून हे पक्ष परिवर्तन घडले. ‘दिबां’साहेबांच्या नावासाठी भूमिपुत्र पेटून उठला, मात्र शेकापवाले किंतु-परंतु करीत ठाकरे सरकारच्या दावणीला बांधून राहिले. माझ्या वडिलांचे नाव प्रकल्पाला लागले पाहिजे असा कुठल्याच मुख्यमंत्र्याने हट्ट केला नाही, मात्र या ठिकाणी करून भूमिपुत्रांच्या भावना संतप्त करण्याचे काम ठाकरे सरकारने केले आहे.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची शेकापवर टीका
‘दिबा’साहेबांच्या नावासाठी सर्वपक्षीय लढा उभारला. लढ्याला मोठे यश आले, मात्र समिती रामशेठ ठाकूर यांनी हायजॅक केली, असा आरोप शेकाप करतो, पण समितीत बाळाराम पाटील यांना कार्याध्यक्षपद होते. मग त्यांनी का काम केले नाही, असा सवाल करून लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, शेकापला पनवेल, उरणमधून हद्दपार केले. पूर्वी शेकापला शेपूट कापलेला पक्ष व त्यानंतर डबके बोलले जायचे, मात्र आता ते डबकेसुद्धा राहिले नाही.

घोटाळेबाजांना राज्य सरकार पाठीशी घालतंय -आमदार महेश बालदी
520 कोटी रुपयांचा कर्नाळा बँ घोटाळा करूनही शेकापचे नेते उजळ माथ्याने फिरतात. कारण छळकपट करून आलेले राज्य सरकार या घोटाळेबाजांना पाठीशी घालत आहे. उरण नगरपालिकेत शेकाप शून्य आहे, मात्र नगरपालिका जिंकणार असल्याचा कांगावा करीत ते स्वतःची किंमत करून घेत आहे. स्वबळावर यांची काहीच ताकद नाही. त्यामुळे इतर पक्षांच्या कुबड्या घेऊन शेकाप तग धरण्याचा प्रयत्न करतोय, अशी टीका आमदार महेश बालदी यांनी या वेळी केली.

रायगड जिल्ह्यात शेकाप पूर्वी एक नंबरला होता, मात्र काही नेत्यांच्या उपद्व्यापांमुळे पक्ष रसातळाला गेला. लोकांचे पैसे लुटले, त्यांचे हाल केले. ‘दिबां’चे नाव विमानतळाला लागावे यासाठी सर्वपक्षीय एकत्र आले, मात्र शेकाप स्वतःचे राजकारण करीत बसला. गावावर आलेल्या संकटात लोकनेते रामशेठ ठाकूर धावून आले आणि त्यांणी ग्रामस्थांना मोठा दिलासा दिला. याउलट विवेक पाटलांनी सर्वसामान्यांसोबत शेकापच्या लोकांनाही फसविले. मला कर्नाळा बँकचे संचालकपद देण्याचे आश्वासन दिले होते. माझे नशीब चांगले होते. सुदैवाने मी संचालक झालो नाही.
-सुनील म्हात्रे

मी शेकापतून आलो म्हणून शेकापवाले मी गद्दारी केली असे बोंबलत बसतील. प्रवेश करू नका म्हणून मला अनेक विनवण्या करण्यात आल्या, पण मी रोखठोक सांगितले आता माघार नाही. मी शब्द दिला आहे आणि तो पूर्ण करून भाजप वाढविण्यासाठी प्रयत्न करणार. आमच्या गावावर संकटाची वेळ आली तेव्हा लोकनेते रामशेठ ठाकूर एका फोनवर धावून आले. आमच्यासाठी रस्त्यावर ठिय्या मांडून बसले. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाने आम्हाला दिशा दिली आहे.
-गजानन म्हात्रे

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply