Breaking News

जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणार - ना. रवींद्र चव्हाण

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले राज्यातील सरकार जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेऊन महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने निश्चितपणे घेऊन जाईल, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी रविवारी (दि. 28) येथे केले. उरण भाजपतर्फे आयोजित सत्काराला ते उत्तर देत होते.
राज्यात नवीन स्थापन झालेल्या युती सरकारमध्ये रवींद्र चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून जबाबदारी दिल्यानंतर त्यांचा उरण भाजपच्या वतीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. जेनएपीए टाऊनशिप येथील बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, खालापूर तालुका अध्यक्ष रामदास ठोंबरे, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्य जयविंद कोळी, शहराध्यक्ष कौशिक शाह, भाजप नेते विनोद साबळे, जितेंद्र घरत, शेखर तांडेल, माजी जि. प. सदस्य ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते. या वेळी विविध पक्षांतील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे मान्यवरांनी पक्षाची शाल देऊन स्वागत केले.
ना. रवींद्र चव्हाण म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राला मागे नेण्याचे काम केले, परंतु नव्याने आलेले युतीचे सरकार हे दोन इंजिनचे सरकार असून महाराष्ट्राचा विकास झपाट्याने होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात विकासाची गंगा आणली आहे. गोरगरीबांसाठी 243 योजना सुरू केल्या. त्याचा लाभ जनतेला होत आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदींनी देशातील लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत स्वच्छ भारत योजना सुरू केली. त्यांच्या नेतृत्वामुळे जगात भारताचे नाव उंचावले असून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.
उरणमधील मोरा पोलीस ठाण्याच्या इमारतीचे जे काम निधीअभावी थांबले आहे त्यासाठी मी माझ्या खात्यातून निधी देऊन ते काम पूर्णत्वास नेणार, असे या वेळी ना. चव्हाण यांनी जाहीर केले. त्याचप्रमाणे ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यांचा भ्रमनिरास होऊ देणार नाही, असेही सांगितले.
आमदार महेश बालदी यांनी आपल्या भाषणात ना. रवींद्र चव्हाण आपल्यासोबत असल्याने या भागाची कामे निश्चित मार्गी लागतील, असे सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे या भागात कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात आली आहेत. त्यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत असलेल्या जेएनपीटी सेझमध्ये येथील स्थानिक प्रकल्पग्रस्त लोकांना लवकरच मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार असल्याचे सांगून केलेल्या कामांमुळे येत्या निवडणुकीत मी 50 हजारांपेक्षा जास्त मताधिक्क्याने निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकनेते दि. बा. पाटीलसाहेब यांच्या नावासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिपूत्र संघर्ष समितीने भेट घेतली तेव्हा तुम्ही रस्त्यावर उतरलात, तर आमचे शिवसैनिक रस्त्यावर उतरतील, अशी वल्गना उद्धव ठाकरे यांनी केली होती, असे सांगून आमदार महेश बालदी पुढे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांत कामे कमी झाली, कारण कोरोना तर होताच, पण महाराष्ट्रात नष्टर सरकार होते जे स्वत: आजारी होते आणि महाराष्ट्रालाही त्यांनी आजारी पाडले, परंतु आम्ही जनतेच्या विकास कामांना अधिक प्राधान्य दिले आहे. राजकारणाच्या वेळी राजकारण, मात्र विकासकामात पक्षभेद न ठेवता कामे करीत आहोत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजप वाहतूक विभागाचे सुधीर घरत यांनी केले.

ना. रवींद्र चव्हाण अत्यंत विनम्र व्यक्तिमत्त्व -लोकनेते रामशेठ ठाकूर
या कार्यक्रमात बोलताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांचे तोंडभरून कौतुक केले. ना. रवींद्र चव्हाण हे अत्यंत विनम्र व्यक्तिमत्व असून गर्व नसलेला या कार्यकर्त्याला मंत्रिपदी बसविल्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात विकासाची कामे होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी त्यांनी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या कार्याचीही प्रशंसा केली.

कर्नाळा बँक घोटाळ्यातील संचालकांनाही लवकरच अटक होणार आहे. सर्वसामान्य जनतेचा पैसा बुडविणारे शेकापचे माजी आमदार विवेक पाटलांचा बँक घोटाळा बाहेर काढण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गावोगावी जनजागृती करून आवाज उठविला. त्यामुळे मग्रूर विवेक पाटील आज जेलची हवा खात आहेत.  
-महेश बालदी, आमदार, उरण

नवाब मलिक जेलमध्ये गेले, पण त्यांचे मंत्रिपद मात्र गेले नव्हते. असे भ्रष्टाचार्‍यांना पाठिंबा देणारे महाविकास आघाडीचे सरकार राज्यात होते. ते गेले असून जनतेचे हित साधणारे सरकार सत्तेत आले आहे. गरीब, सामान्य जनतेचे पैसे बुडविणार्‍या कर्नाळा बँक घोटाळ्यात ज्यांचा ज्यांचा सहभाग आहे त्या प्रत्येकाला अटक झाली पाहिजे आणि ती होणारच.
-आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष, रायगड जिल्हा भाजप

विविध पक्षांतील अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश
या कार्यक्रमात शिवसेनेचे जि.प. सदस्य विजय भोईर, विजय विकास सामाजिक संस्थेचे विकास भोईर, धूतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच रेश्मा ठाकूर, उपसरपंच शरद ठाकूर व सदस्य, जासई ग्रामपंचायत सदस्य बळीराम घरत, उद्योजक देवेंद्र पाटील, अमर पाटील, आवरेचे धनेश गावंड, सांगुर्लीचे माजी सरपंच राजेंद्र माटे, गोवठणेच्या उपसरपंच कविता म्हात्रे, कर्नाळा ग्रामपंचायत सदस्य विनोद पवार, राजन भोजने, आपटा ग्रामपंचायत सदस्य असद पिट्टू, बांधपाडा ग्रामपंचायतीचे देवानंद पाटील, वासंबे-मोहोपाड्याचे संदीप मुंडे, सागर देशमुख, चंदन घरत, हेमानंद पाटील, करंजामधून धनराज कोळी, गिरीश कोळी यांच्यासह बोकडविरा, पाणदिवे, सारडे, आवरे, कोप्रोली, पाले, वशेणी, विंधणे आदी गावांतील शिवसेना, काँग्रेस, शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे मान्यवरांनी स्वागत केले.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त पिंपरी-चिंचवडकर खासदार श्रीरंग बारणे …

Leave a Reply