नोंद नसल्याने सोयीसुविधा नाहीत
नवी मुंबई : प्रतिनिधी
कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने बहुतांश नाका कामगार शहरात परतु लागले आहेत. सध्या कामाच्या प्रतीक्षेत दररोज नाक्यावर गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शासनाकडून बांधकाम व्यवसायाला परवानगी दिली असली, तरी कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या भीतीने ते चिंताग्रस्त आहेत. दरम्यान, नवी मुंबईत सुमारे तीन हजार नाका कामगार असून त्यापैकी केवळ 150 जणांची कामगार आयुक्तांकडे नोंद असल्याने उर्वरित हजारो कामगार शासनाच्या सोयीसुविधांपासून वंचित आहेत.
कोरोनात नवी मुंबई परिसरात काम मिळत नसल्याने नाका कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. नवी मुंबईत जवळपास तीन हजारांहून अधिक नाका कामगार विविध नाक्यावर कार्यरत असत. नवी मुंबई पालिका क्षेत्रात उदरनिर्वाह भागवण्यासाठी कामगार वर्ग दरवर्षी दाखल होतात. गतवर्षी संपूर्ण ताळेबंदी करण्यात आली होती. त्यामुळे कामगारांचे हाल झाले. यंदा बांधकाम क्षेत्रातील कामासाठी परवानगी दिली असली तरी मोठ्या प्रमाणात काम नसल्याने हातावर पोट भरणार्या नाका कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
कोरोनामुळे बांधकामे संथ गतीने सुरू आहेत. अनेक ठिकाणी कामे बंद आहेत. कामगार वर्गावर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी कामगारांना शासनाकडून मदतीसाठी हात पुढे केला आहे. नोंद असणार्या कामगारांना मदत मिळणार, परंतु नोंदच नसलेल्या कामगारांचे काय? असा प्रश्न कामगार नेते दत्ता घंगाळे यांनी उपस्थित केला आहे. दररोज नाक्यावर कामासाठी कामगार गर्दी करत आहेत, नवी मुंबईत बहुतांश कामगारांच्या नोंदीच शासन दरबारी नसल्याने आपल्या खात्यात येणार्या शासनाच्या दीड हजार रुपयांपासून ते वंचित आहेत. गतवर्षी ताळेबंदीमुळे उपासमार झाली. यंदाही तीच परिस्थिती त्यांच्यावर ओढवली आहे.
सकाळी कामासाठी बाहेर पडतो, पण काम मिळत नाही. पावसाळ्यात गावी जावे तर तेथेही हाताला कामे नाहीत. सोबत कुटुंब आहे. खायचे काय हा प्रश्न त्यांच्या समोर पडला आहे. नवी मुंबईत तुर्भे, वाशी, रबाळे, नोसिल नाका, वाशी नाका, सेजल गॅस नाका नेरूळ आदी नाक्यांवर मोठ्या संख्येने कामगार कामाच्या प्रतीक्षेत असतो असे चित्र आहे.
नवी मुंबईतील नाका कामगारांची खूपच बिकट अवस्था झाली आहे. केवळ 150 कामगारांची नोंद शासनाकडे आहे. परिणामी, सुमारे 3,000 कामगारांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने कामगार विभागाकडे नवी मुंबईतील नाका कामगारांना शासनाच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न आहेत. कामगारांना सुविधांचा लाभ व न्याय आम्ही मिळवून देणार आहोत.
-दत्ता घंगाळे, कामगार नेते तथा भाजप युवा मोर्चा अध्यक्ष, नवी मुंबई