दुसरी लाट ओसरली नाही; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असा समज झाला असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महत्त्वपूर्ण माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरली नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात काळजी घेण्याची आवश्यकता असल्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाही गणेशोत्सव, दसरा-दिवाळी कोरोना नियमांसोबत साजरी करावी लागणार आहे. लसीकरण झाल्यानंतरही मास्क आणि कोरोनाचे नियम पाळणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरली नाही. कोरोना रुग्णसंख्येत नेहमीत सणासुदीनंतर वाढ झाल्याचे दिसून येते. त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील सण जबाबदारीने साजरे करणे गरजेचे आहे, असे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले. लसीकरणामुळे रोगाची तीव्रता कमी होते आणि रुग्णालयात दाखल करण्याची स्थिती ओढावत नाही. त्यामुळे लसीकरण झाल्यानंतरही मास्क आणि कोरोना नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले. केरळमधील कोरोना स्थितीवरही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. सध्या देशात रोज येणार्या कोरोना प्रकरणात केरळमधून 51 टक्क्यांहून अधिक रुग्ण आहेत, असेही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
उत्सव काळात गर्दी टाळणे आवश्यक आहे. गर्दीमुळे करोना अधिक वेगाने पसरण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात अनिवार्य गर्दीच्या ठिकाणी दोन लस घेण्याची अट असावी, असे इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितले.
रुग्णसंख्येत वाढ
देशात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या 40 हजारांपेक्षा कमी होती, मात्र गुरुवारी (दि. 26) सकाळी संपलेल्या 24 तासांत पुन्हा रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. ही वाढ आधीच्या रुग्णसंख्येत तब्बल 23 टक्के आहे. देशात 46 हजार 164 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 607 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुंबईत एकाच वसाहतीत कोरोनाचे 17 रुग्ण आढळले आहेत. ही वसाहत सील करण्यात आली आहे. मुंबईतील आगरी पाड्यातील सेंट जोसेफ आश्रमातील 22 मुलांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. मुलांचा उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
महाराष्ट्रात ‘डेल्टा’चा प्रादुर्भाव
मुंबई : एकीकडे कोरोनाचा धोका अद्याप कमी झालेला नसतानाच महाराष्ट्रात डेल्टा प्लसचा 24 जिल्ह्यांमध्ये प्रादुर्भाव झाला आहे. राज्यातील रुग्णांची संख्या 103वर पोहचली आहे. त्यामुळे बारकाईने लक्ष ठेवण्याचे तज्ज्ञांचे मत आहे. राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये डेल्टा पल्स या कोरोनाच्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव झाला आहे. यात 50 टक्के रुग्ण हे विदर्भ आणि कोकण विभागातले आहेत.