महाडममध्ये ना पगार, ना मदत; ठाकरे सरकारवर कामगार नाराज
महाड : प्रतिनिधी
महाडमध्ये पूर आला आणि अनेकांचे संसार उद्ध्वस्थ झाले. घरात पाणी गेल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली, मात्र पूरग्रस्त एसटी कामगारांना गेली दोन महिने पगार, पूरग्रस्त म्हणून मदत मिळालेली नाही. महामंडळाच्या या भूमिकेवर कामगारांनी संताप व्यक्त केला आहे.
संपूर्ण कोकणात महापुराने हाहाकार माजवला. यामध्ये अनेकांचे संसार पुरात वाहून गेले. यामधून एसटी कर्मचारीदेखील सुटले नाहीत, मात्र महाराष्ट्र एसटी महामंडळाचा कोणताच पदाधिकारी अगर अधिकारी कर्मचार्यांचे दु:ख जाणून घेण्यास फिरकला नाही. महाड एसटी आगारात कधी नव्हे ते पुराचे पाणी जवळपास सात ते आठ फुटापर्यंत आले. यामध्ये एसटीच्या 41 गाड्या पूर्णपणे बुडाल्या. महाड आगाराच्या बसेस आणि स्थावर मालमत्ता असे अंदाजे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सद्या यातील बहुतांश बसेस रुळावर आल्या असल्या तरी कामगारांचे जनजीवन मात्र अद्याप रुळावर आलेले नाही. गेली दोन महिने एसटी कामगारांना वेतनच मिळालेले नाही. यामुळे महाड आगारातील जवळपास 293 कामगार वेतनापासून वंचित आहेत.
महाडमध्ये अनेक एसटी कामगार हे बाहेरून आलेले आहेत. यामुळे भाडे तत्वावर घरे घेऊन याठिकाणी राहत आहेत. या महापुरात या कामगारांचे नुकसान झाले आहे, मात्र महामंडळाने कोणत्याच प्रकारची जीवनावश्यक साधनांची मदत दिली नाही. एकीकडे वेतन दिले गेले नाही तर दुसरीकडे मदत नसल्याने हे कामगार हतबल झाले आहेत.
महाड आगारातील प्रभारी आगार प्रमुख शिवाजी जाधव यांनी स्थानिक प्रशासन आणि काही सामाजिक संस्थांकडून कामगारांना मदतीचे संचय वाटप केले. यावर हे कर्मचारी उभे राहत असले तरी घरातील अन्नधान्य, कपडे, इतर सामानाचे नुकसान झालेले जवळपास 161 कर्मचार्यांची यादी पाठवण्यात आली. त्यातील 34 पंचनामे प्राप्त झाले असल्याचे सांगण्यात आले. कामगारांच्याच पतसंस्थेतून या कामगारांना तीन महिन्यांचा पगार बिनव्याजी कर्ज स्वरूपात शासनाने दिला आहे. तर काही कामगारांना अरुणोदय बँकेने 2000 रुपयांची मदत केली असल्याचे आगार प्रमुख शिवाजी जाधव यांनी सांगितले.
गेली दोन महिने एसटी कामगार वेतनापासून वंचित आहेत. एकीकडे महापुरात झालेले नुकसान भरून कसे काढायचे असा प्रश्न डोळ्यासमोर असताना कामगार हतबल झाला आहे.
-दत्तराज पवार, मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटना
एसटी कामगार अहोरात्र काम करतात. जशी ऑर्डर येईल त्याप्रमाणे ते काम करत आहेत, मात्र गेली दोन महिने वेतन दिलेले नाही. कामगारांनी कसे जगायचे हा मोठा प्रश्नच आहे
-शेखर सावंत, अध्यक्ष एसटी कामगार संघटना, महाड