वाशिम ः प्रतिनिधी
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या शिक्षण संस्थांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केली आहे. ईडीकडून या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. वाशिममधील देगाव, शिरपूर व इतर अशा पाच शिक्षण संस्था आहेत. मागील वर्षी तेथून पाच कोटी चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. बालाजी पार्टिकल बोर्ड या कारखान्यात घोटाळा झाल्याचाही आरोप खासदार गवळी यांच्यावर आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण उघडकीस आणले होते. ईडीच्या कारवाईनंतर सोमय्या यांनी गवळी यांच्या टीमने 100 कोटींची लूट नाही, तर माफियागिरी चालवली आहे, असा आरोप केला आहे.
अनिल परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा -किरीट सोमय्या
मुंबई ः अनिल परब यांनी मंत्री असतानाही बेकायदेशीर रिसॉर्ट बांधला. मंत्रीमहोदय बेकायदेशीर बांधकाम करतात आणि त्यांना वाचवण्याचे पाप मुख्यमंत्री परिवार करीत आहे. परब यांनी केलेल्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाईचे आदेश दिले गेले आहेत. त्यामुळे त्यांची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी (दि. 30) पत्रकार परिषदेत केली. याचबरोबर अनिल देशमुख व अनिल परब यांना तुरुंगात जावेच लागणार असल्याचेही ते म्हणाले.
अभिनेत्री जॅकलिनची चौकशी
नवी दिल्ली ः ईडीने सध्या अनेकांची चौकशी सुरू केली आहे. यातच आता बॉलीवूडमधून एक नाव समोर आले आहे. मनी लॉण्डरिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची ईडीने सोमवारी (दि. 30) दिल्लीत कसून चौकशी केली.