Breaking News

पालीमध्ये नाल्यात पडून दुचाकीस्वार जखमी

पाली : रामप्रहर वृत्त

सुधागड तालुक्यातील पाली एसटी स्थानकाजवळील  स्लॅब फोडलेल्या नाल्यात पडून सोमवारी (दि. 30) एक दुचाकीस्वार जखमी झाला. अनेक महिन्यांपासून उघडा व धोकादायक स्थितीत असलेल्या या नाल्याकडे नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

पाली एसटी स्थानकात तुंबलेले सांडपाणी काढण्यासाठी तत्कालीन ग्रामपंचायतीने परिहन मंडळाच्या परवानगीने हा नाला व त्यावरील स्लॅब मागील वर्षी 5 नोव्हेंबरला तोडला होता. मात्र तब्बल साडे नऊ महिने उलटून गेले तरी या नाल्यावर स्लॅब टाकण्यात आलेला नाही. तत्कालीन ग्रामपंचायतीने सांगितले होते की हा नाला दुरुस्त करण्याची जबाबदारी परिवहन मंडळाची आहे. मात्र परिवहन मंडळाने त्यावर कोणतीही भूमिका घेतली नाही.

काही महिन्यांपूर्वी पाली ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले आणि प्रशासकांकडे कारभार आला. हा नाला नगरपंचायतीच्या माध्यमातून बांधण्यात येईल, असे प्रशासक दिलीप रायण्णावार यांनी सांगितले होते. मात्र अजूनही हा नाला जैसे थे आहे. स्लॅब नसल्याने नाला धोकादायक झाला आहेच. शिवाय येथील सांडपाणी व दुर्गंधी यामुळे स्थानकात येणारे प्रवासी, आजुबाजूचे दुकानदार व नागरिकांचे आरोग्यदेखील धोक्यात आले आहे. सोमवारी सकाळी एक दुचाकीस्वार या नाल्याशेजारी रस्त्यावर उभा राहून दुसर्‍या गाडीला जागा देत होता, त्यावेळी तोल जाऊन तो नाल्यात पडला. आजूबाजूच्या लोकांनी अथक प्रयत्न करून दुचाकी व दुचाकीस्वाराला नाल्यातून बाहेर काढले.

एसटी स्थानक परिसरातील नाल्याच्या दुरुस्ती संदर्भात निविदा काढण्यात आली आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल.

-दिलीप रायण्णावार, प्रशासक, पाली नगरपंचायत, ता. सुधागड

Check Also

पेणमध्ये भाजपचा बूथ मेळावा उत्साहात

पेण ः रामप्रहर वृत्त रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.14) पेण तालुक्यात भाजपच्या बूथ मेळाव्याचे …

Leave a Reply