देशात प्रचाराला आता चांगलाच रंग चढू लागलायं. भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकहाती प्रचार सुरू केला आहे. त्यांच्या प्रचाराच्या झंझावातापुढे विरोधी काँग्रेस आणि मित्रपक्ष निष्प्रभ ठरत आहेत. महिनाभर चालणार्या या प्रचाराच्या गदारोळात मतदार आपल्या देशाची सूत्रे कोणाच्या हाती सुपूर्द करतोय याकडे सार्या जगाचे लक्ष लागून राहिलेले आहे.
लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम चढत्या उन्हासारखा आता चांगलाच तापू लागलायं. आता पुढील महिनाभर देशाच्या कानाकोपर्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू राहणार आहे. अर्थात या रणधुमाळीत भाजप आणि मित्रपक्षच आघाडीवर असल्याचे आशादायी चित्र सर्वत्र दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर भाजपच्या प्रचाराची सूत्रे आपल्या हाती घेत देशात सर्वत्र झंझावात सुरू केला आहे. गुरुवारी मोदींनी मेरठ येथून प्रचाराला धडाक्यात प्रारंभ केला आहे. भाजपचे स्टार प्रचारक म्हणून ते अवघ्या देशभरात सर्वत्र संचार करू लागलेत. त्यांच्या प्रत्येक सभांना रेकॉर्डब्रेक गर्दी होत आहे. प्रत्येक सभेत मोदी निरनिराळे विषय मांडून सर्वसामान्यांना आकर्षित करीत आहेत. सन 2014 मध्येही मोदींनी देशभरात असाच प्रचाराचा वणवा पेटवून देत भाजपला एकहाती सत्ता मिळवून दिली होती. आताही तशीच परिस्थिती असल्याचे दिसत आहे. प्रचंड उत्साह आणि सभेतील लाखो जनांना आपलेसे करण्याची कला मोदींना चांगलीच अवगत असल्याने ते आता या सभेत नेमके काय बोलतात याकडे सार्या देशाचे लक्ष लागून राहिलेले असते. प्रत्येक सभेत विरोधकांची खिल्ली उडविण्यासही ते कमी करीत नाहीत. प्रसंगानुरूप देशात आपल्या सरकारने केलेल्या विकासकामांचा लेखाजोखाही घेत भविष्यात आपल्या सरकारला कशाप्रकारे विकास करायचा आहे हे ठामपणे सांगतात. या वेळीही मोदी लाट नसली, तरी मोदी या देशाचे पुन्हा पंतप्रधान व्हायला हवेत असे मतदारांना वाटत असल्याचे आशादायी चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. देशात गेल्या पाच वर्षातील विकासाचा सुरू असलेला वेग आणि काँग्रेस राजवटीतील विकासकामांचे वेग याचा लेखाजोखा सर्वसामान्य मतदार करीत आहे. काँग्रेस राजवटीपेक्षा मोदी यांच्या कार्यकाळात मूलभूत नागरी समस्या सुटू लागल्याचे चित्र सर्वत्र दिसत असल्याने या वेळीही मतदारराजा मोदींच्याच नेतृत्वाखालील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाच पुन्हा सत्तेवर विराजमान केल्याशिवाय राहणार नाही. कारण देशातील जनतेला आता विकासाला प्राधान्य देणारे नेतृत्व हवे आहे. मोदींचे नेतृत्व हे विकासाभिमुख असल्याने देशाची सूत्रे नरेंद्र मोदी नामक अवलियाच्या हातीच असणे सर्वसामान्य नागरिकांना हिताचे वाटू लागले आहे. याउलट विरोधी काँग्रेस आणि मित्रपक्षांचा प्राचार भरकटल्याचे जाणवत आहे. अजूनही काही मतदारसंघात काँग्रेस आणि मित्रपक्षांना उमेदवारच मिळत नसल्याचे दिसत आहे. जे उमेदवार उभे केलेत त्यांना आपण विजयी होऊ की नाही याची शाश्वती नाही. केवळ बळीचा बकरा बनण्यासाठी कुणीही तयार होताना दिसत नाही. त्यामुळे कुणाला तरी उभे करून काँग्रेसवाले प्रचार करताना दिसत आहेत. काँग्रेसकडे दुसर्या फळीची वाणवा आहे. त्यामुळे सारी भिस्त एकट्या राहुल गांधी यांच्यावरच आहे. अजून प्रचाराला किमान महिनाभर लागणार आहे. तोपर्यंत त्यांचा स्टॅमिना कितपत टिकतो यावर देखील प्रचाराचे भवितव्य अवलंबून आहे.