Breaking News

राज्य शासनाच्या अनियमिततेचा शिक्षण व्यवस्थेला फटका -अमर वार्डे

पेणमध्ये गुणीजनांचा सत्कार

पेण : प्रतिनिधी

 राज्य सरकारच्या अनियमित कारभारामुळे शिक्षण व्यवस्था दिवसेंदिवस खिळखिळी होत चालली असून त्याचा विपरित परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होणार असल्याची भीती दत्ताजी खानविलकर एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष अमर वार्डे यांनी पेण येथे व्यक्त केली.

पेण येथील सोबती संस्था व बापूसाहेब नेने फाउंडेशन  यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या गुणीजनांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात अमर वार्डे बोलत होते. या वेळी त्यांनी राज्य सरकारच्या शैक्षणिक धोरणावर जोरदार टीका केली.

शाळा सुरू करण्यासाठी राज्य सरकारला कोरोनाची भीती वाटते. मात्र हॉटेल रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास कोरोनाची भीती नाही. मुल हॉटेलात गेली तर त्यांना कोरोना होणार नाही. मात्र शाळेत गेल्यास त्यांना कोरोना होईल, असा शासनाचा दृष्टिकोन दिसतो, असे अमर वार्डे म्हणाले.

बापूसाहेब नेने फाउंडेशनचे अध्यक्ष मंगेश नेने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते प्रज्ञेश लक्ष्मण म्हात्रे, वेणूनाथ विष्णू कडू, विनायक दिनकर पाटील, विठोबा हनुमंत पाटील, ज्योती दिपक अवघडे, राजू बळीराम मुंबईकर, समीर सुभाष म्हात्रे, नील योगेश म्हात्रे आदी गुणवंतांचा शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.  बापूसाहेब आठवले, शुभांगी नेने, सचिन मदाने, डॉ. नीता कदम, प्रा. सदानंद धारप, मुख्याध्यापिका रोहिणी म्हात्रे, केतकी साठे, डॉ. मंदार जोशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर फुंडे यांनी केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply