Breaking News

पालीतील नवीन बसस्थानकाच्या बांधकामास मुहूर्त काही मिळेना!

इमारत पाडली, पुनर्बांधणी रखडली!

पाली : रामप्रहर वृत्त

सुधागड तालुक्यातील पाली येथील मोडकळीस आलेल्या एसटी बसस्थानकाची इमारत पाच महिन्यांपूर्वी पाडण्यात आली आहे, मात्र त्या ठिकाणी नवीन इमारत बांधणीस अजूनही सुरुवात झालेली नाही. दरम्यान, बसस्थानक इमारती अभावी प्रवासी व परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांची गैरसोय होत आहे.

अनेक वर्षे धोकादायक स्थितीतल्या पाली बसस्थानकाची इमारत तोडून त्या ठिकाणी नवीन इमारत उभारावी, यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडे मागणी करण्यात येत होती. सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांनी उपोषणे व आंदोलनेदेखील केली. त्यानंतर 2016 मध्ये बस स्थानकाच्या नवीन इमारतीकरिता राज्य परिवहन महामंडळाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला. मात्र बस स्थानकाच्या पुनर्बांधणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते रवींद्रनाथ ओव्हाळ यांनी मार्च महिन्यात पाच दिवस उपोषण केल्यानंतर नवीन इमारत बांधण्यासाठी परिवहन महामंडळाकडून बसस्थानकाची धोकादायक इमारत जमीनदोस्त करण्यात आली. त्याला पाच महिने उलटून गेले तरी नवीन इमारतीच्या बांधण्याकडे परिवहन महामंडळ कानाडोळा करतांना दिसत आहे. दरम्यान, स्थानकाच्या आवारात कर्मचारी व प्रवाशांसाठी तात्पुरती शेड उभारण्यात आली आहे. मात्र तेथे सर्वांचीच गैरसोय होत आहे.

  दुर्गंधी आणि गैरसोय

पाली एसटी बसस्थानकात मोठमोठे खड्डे पडले आहेत. या स्थानकाच्या आवारात दूषित पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. निवारा शेडदेखील दूषित पाण्यात आहे. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मद्यपींमुळे स्थानक परिसर दारूचा अड्डा बनला आहे. स्थानकाजवळील नाल्यावरील स्लॅब तोडला असल्याने गाड्यांना प्रवेश करण्यास व बाहेर जाण्यास अडथळा निर्माण होतो. शिवाय या उघड्या नाल्यामुळे घाण व दुर्गंधी पसरते. या नाल्यात एक बाईकस्वारदेखील कोसळला होता.

   दोन कोटी 36 लाखांचा निधी मंजूर

बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी तब्बल दोन कोटी 36 लाखांचा निधी नोव्हेंबर-डिसेंबर 2019 मध्ये मंजूर झाला आहे. यामध्ये नवीन सुसज्ज इमारतीसह विविध सुविधांचा समावेश आहे. इमारतीच्या प्रत्यक्ष बांधकामास जानेवारी 2020 पासून सुरुवात होणार होती, मात्र दीड वर्ष उलटूनही अजून एक वीटसुद्धा बसविण्यात आलेली नाही.

राज्य परिवहन महामंडळाच्या रायगड विभाग नियंत्रकांकडून पाली बसस्थानकाच्या तत्काळ पुनर्बांधणीचे लेखी पत्र देण्यात आले होते, परंतु आज पाच महिने उलटून गेले असून परिवहन महामंडळाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे, मात्र लवकर बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू केले नाही, तर पुन्हा आमरण उपोषण करण्यात येईल.

-रवींद्रनाथ ओव्हाळ, जिल्हा सचिव, रिपाइं रायगड 

मोडकळीस आलेली पाली बसस्थानकाची इमारत पाडण्यात आली आहे. लवकरच नवीन इमारतीच्या बांधकामास सुरुवात करण्यात येईल. पावसामुळे काम थांबले आहे, परंतु संबंधित ठेकेदारास लवकरात लवकर काम चालू करण्यास सांगितले आहे.

-अनघा बारटक्के, विभागीय नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ रायगड

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply