Breaking News

सर्व निकष सांगताहेत – देश पुन्हा कामाला लागला!

कोरोनानंतर भारतीय अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे सर्व आर्थिक निकष सांगत आहेत. याचा अर्थ आता कोरोनाचे दररोजचे आकडे मोजत बसण्यापेक्षा कामाला लागण्याची वेळ आली आहे, कारण अनेक भारतीय नागरिक कामाला लागले म्हणूनच सर्व आर्थिक निकषांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे.

कोरोना साथीच्या काळात जगासोबत आपल्या देशाच्याही अर्थव्यवस्थेला फटका बसला. आता त्यातून कसे सावरता येईल, यासाठी आपण सर्व प्रयत्नशील आहोत. त्या प्रयत्नांना किती यश मिळते हे नजीकचा काळच ठरविणार आहे, पण अलीकडे जी आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे तीनिश्चितच दिलासा देणारी आहे. संघटीत अर्थव्यवस्थेचा भाग नसलेला मोठा वर्ग अजूनही सावरू शकलेला नाही, पण तो सावरण्यासाठीसुद्धा आधी संघटीत अर्थव्यवस्था पटरीवर यावी लागेल. सुदैवाने ती वेगाने पटरीवर येते आहे, असे ताजी आकडेवारी सांगते आहे.

जीएसटीचे बोलके आकडे

देशातील आर्थिक व्यवहार किती होत आहेत, याचा एक खात्रीचा निकष म्हणजे वस्तू आणि सेवा कराची म्हणजे जीएसटीची वसुली होय. कोरोनाच्या काळातील लॉकडाऊनमध्ये ती एक लाख कोटी रुपयांच्या खाली गेली होती. ती गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये 86 हजार कोटी रुपये एवढी खालावली होती. या ऑगस्टमध्ये तो आकडा 1.12 लाख कोटींवर गेला आहे. ईवे बिल हा निकषही तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यावरून भारतीय महामार्गांवर किती माल वाहतूक होते हे लक्षात येते. जूनमध्ये त्याचे प्रमाण 5.46 कोटी होते ते जुलैमध्ये 6.41 कोटी आणि आता ऑगस्टमध्ये 6.33 कोटी झाल्याने ते स्थिर आहे, असे म्हणता येईल.

जीडीपीची झेप

गेल्या वर्षी मार्चमध्ये कडक लॉकडाऊन लागल्यानंतर जीडीपी एकदम खाली आला होता आणि ते समजण्यासारखे होते, कारण सर्वच व्यवहार ठप्प झाले होते, पण या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा जीडीपीचा आकडा नुकताच प्रसिद्ध झाला असून तो गेल्या वर्षीच्या तुलनेत 20.1 टक्क्यांनी वाढला आहे. अर्थात, त्यावेळी तो उणे झाल्याने हा आकडा असा इतका वर आला आहे. पण असे असले तरी जीडीपीमध्ये इतकी सुधारणा फक्त भारतात दिसून आली आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे.

गाड्यांची विक्री वाढली

नागरिक करत असलेली खरेदी हाही अर्थव्यवस्था रुळावर येण्याचा निकष आहे. त्यातील चारचाकी गाड्या विक्रीचे आकडे पाहिल्यास ही सुधारणा किती वेगाने होते आहे हे लक्षात येते. उदा. टाटा मोटर्सने गेल्या वर्षीपेक्षा (18 हजार) यावर्षी 10 हजार अधिक गाड्या (28 हजार) विकल्या आहेत. मारुतीच्या 10 हजार गाड्या कमी विकल्या गेल्या आहेत, हा अपवाद सोडला तर इतर सर्व मोटार कंपन्यांची विक्री गेल्या वर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत दोन ते 296 टक्के वाढली आहे. मारुतीचा आकडा कमी झाला, असे आपण म्हणत असताना तो मुळातच असलेला एक लाख 13 हजारांचा एक लाख तीन हजार झाला आहे एवढेच. दुचाकी विक्रीचे आकडे मात्र खाली आले आहेत. तरी या ऑगस्टमध्ये एकूण साडे बारा लाख दुचाकी विकल्या गेल्या आहेत. व्यावसायिक वाहनांची विक्री तर दुपटीने वाढली आहे.

पेट्रोल, डिझेलच्या मागणीत वाढ

गाड्यांची विक्री तर होते आहे, पण त्यांचा वापर होतो आहे का, असा प्रश्न मनात येतो, पण या प्रश्नाचेही उत्तर आकडेवारीने दिले आहे. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेल एवढे महाग झाले असतानाही त्याची मागणी अनुक्रमे 14 आणि 16 टक्क्यांनी वाढली आहे. तरी काही गाड्या आता सीएनजी आणि विजेवर चालू लागल्या आहेत. त्यातील सीएनजीची विक्रीही अशीच वाढली आहे. विजेच्या गाड्यांची विक्री वाढली असे अजून म्हणता येत नाही, पण ती पुढील काळात चांगलाच वेग घेणार अशीच सर्व लक्षणे दिसू लागली आहेत.

डिजिटल व्यवहारांची झेप

गाड्यांच्या विक्रीसोबत छोटे डिजिटल व्यवहार किती होत आहेत हे पाहिले तरी तेथेही चांगलीच वाढ नोंदविली गेली आहे. उदा. युनायटेड पेमेंटस इंटरफेसच्या माध्यमातून ऑगस्टमध्ये 3.55 अब्ज व्यवहार झाले आहेत, जे जुलैपेक्षा 9.6 टक्क्यांनी अधिक आहेत. उत्पादनाचा विचार करता तो आकडा मात्र खाली गेला आहे. ज्याला पीएमआय म्हणतात तो आकडा जुलैमध्ये 55.3 होता. ऑगस्टमध्ये तो 52.3 इतका झाला आहे. रेल्वेने ऑगस्टमध्ये नोंदविलेली 16.9 टक्के अधिक मालवाहतूक आणि विजेची देशात 18.6 टक्के वाढलेली मागणी हेही निकष वरील सर्व आकड्यांना साथ देत आहेत.

शेअर बाजारातील तेजी

थोडक्यात, सर्व देश पुन्हा कामाला लागला आहे, याचे प्रतिबिंब या आकड्यांत दिसते आहे. शेअर बाजार सर्वांच्या पुढे चालतो. तो कोठे चालला आहे, हे आपण अचंबित होऊन पाहतो आहोत. तो आता जगात सर्वांत चांगला परतावा देणारा ठरतो आहे. त्यामुळेच परकीय गुंतवणूकदार पुन्हा भारताकडे वळल्याचे दिसू लागले आहे.चलनाचा विचार करता रुपया आता अधिक भक्कम झाला असून परकीय चलनाच्या साठ्याने पुन्हा एक विक्रम (633.558 अब्ज डॉलर) केला आहे. भारत करत असलेली निर्यात ऑगस्टमध्ये 45.17 टक्क्यांनी वाढून 33.14 अब्ज डॉलर झाल्याचा हा परिणाम म्हणता येईल.

-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com

Check Also

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ

स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांची जळगाव केंद्रावर उपस्थिती जळगाव ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर …

Leave a Reply