Breaking News

बाप्पाच्या स्वागतासाठी श्रीवर्धन बाजारपेठ फुलली

नारळाबरोबरच यंदा केवडाही महागणार!

श्रीवर्धन : प्रतिनिधी

कोरोनामुळे गतवर्षी सण, उत्सव साजरे करण्यावर शासनाने काही बंधने घातली होती, मात्र यंदा निर्बंधात  शिथिलता दिल्यामुळे गणेशोत्सवासाठी श्रीवर्धन बाजारपेठ चांगलीच सजलेली दिसत आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी लागणार्‍या सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ फुलली आहे.

गणेशोत्सव जसजसा जवळ येत आहे तसतशी पूजा आणि सजावटीचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांची श्रीवर्धन बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे. याठिकाणी उत्पादित होणार्‍या नारळाच्या भावाची उंची मात्र नारळाच्या झाडाप्रमाणे वाढलेली दिसत आहे. लागोपाठ झालेल्या दोन चक्रीवादळात श्रीवर्धन किनारपट्टीवरील नारळाची अनेक झाडे पडली होती. त्यामुळे आता नारळाचा तुटवडा भासू लागला आहे. गणेशोत्सवात बाप्पांना आवडणारे मोदक बनवण्यासाठी प्रामुख्याने नारळातील खोबर्‍याचा वापर केला जातो. तसेच नारळाचं वाटण असल्याशिवाय जेवणाला चव येत नाही. मात्र श्रीवर्धनमध्ये यंदा अलिबाग, मुरूड, वेळास येथून नारळ आयात केले जात आहेत.

निसर्ग आणि तौत्के चक्रीवादळात समुद्रकिनार्‍यावरील सुरू व केतकी नामशेष झाली आहे. त्यामुळे गणेशाच्या पूजेसाठी लागणार्‍या 21 पत्रीमधील केवडा यंदा केवढा महागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. शंभर ते दिडशे रुपयाला मिळणारे केवड्याचे एक फुल यंदा बाजारात येण्याची शक्यता फार कमी आहे. मात्र ते बाजारात आल्यास त्याची किंमत दोनशे रुपयांच्यावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply