Breaking News

माथेरानला पाणीपुरवठा करणारा शारलोट तलाव गळातच

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अक्षम्य दुर्लक्ष

कर्जत : बातमीदार

माथेरानमधील पर्यटनस्थळांपैकी एक, तसेच संपूर्ण माथेरानला पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो त्या शारलोट तलावात गाळाचे साम्राज्य असून या वर्षीही शारलोट तलाव गाळमुक्त होण्याच्या आशा धुसर झाल्या आहेत.

माथेरानमध्ये आलेला पर्यटक हा पर्यटनस्थळ शारलोट तलावाला आवर्जून भेट देतोच. सभोवताली गर्द वनराई, पश्चिमेला दरी असे या तलावाचे सौंदर्य आहे. येथील आल्हाददायक वातावरणामुळे या ठिकाणी आलेला पर्यटक सुखावून जातो. या तलावातून संपूर्ण माथेरानला पिण्यासाठी पाणीपुरवठा होतो. आजही हा तलाव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतो. या तलावाची स्वच्छता गेली सहा वर्षे झालेली नाही. त्यामुळे या तलावात गाळाचे साम्राज्य असून 2015 मध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे श्रीसदस्यांकडून तलावाची सफाई केली गेली होती.

ब्रिटिशकालीन या तलावाची उंची पुलापासून 60 फूट आहे. गेली सहा वर्षे या तलावाची सफाई केली नसल्याने पावसात वाहून आलेला गाळ या तलावात साठला असून, अंदाजे तो 10 ते 15 फूट असण्याची शक्यता आहे. हा गाळ काढण्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण डोळेझाक करत आहे.

एमजेपीकडून तलाव स्वच्छ होत नाही हे समजल्यावर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत याबाबत ठराव घेण्यात आला. काही नगरसेवकांनी ठरावाला विरोध करत हा तलाव एमजेपीच्या अधिकारात असल्याने त्याचे उत्पन्न एमजेपीला मिळत आहे नगरपालिकेला नाही. तेव्हा एमजेपीने या तलावाची सफाई करायला हवी, असे म्हणणे मांडले. तलाव वेळेत साफ न झाल्यास भविष्यात माथेरानला पाणीटंचाईचे संकट भासू शकते, अशी भीती सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे, कोकणवासीय मंडळाचे उपाध्यक्ष केतन रामाणे यांनी व्यक्त केले आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply