खोपोली : प्रतिनिधी
दोन वर्षे कोरोना संकट व त्या अनुषंगाने लावण्यात आलेली बंधने व गरीब आदिवासी कुटुंबांवर ओढवलेले आर्थिक संकट याची जाणीव ठेवत खोपोली सहज सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून रविवारी (दि. 5) आदिवासी व अन्य विविध समाजांतील 44 गरीब जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा साजरा करण्यात आला. कोरोना नियमांचे पालन होण्यासाठी दोन टप्प्यांत हा विवाह सोहळा खोपोलीतील श्रीराम मंगल कार्यालयात पार पडला. या वेळी सर्व 44 जोडप्यांना कन्यादान रूपाने संसारोपयोगी साहित्य, कपडे व जीवनावश्यक वस्तू मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आले.
या सोहळ्यातील नववधू-वर यांना आशीर्वाद व कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी खालापूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते, खोपोली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार, तसेच खोपोली शहरातील सर्वपक्षीय नेते, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे यांच्या नेतृत्वाखाली कार्याध्यक्ष माधुरी गुजराथी, उपाध्यक्ष इशिका शेलार, सचिव वर्षा मोरे, खजिनदार संतोष गायकर, कार्यवाह बी. निरंजन, प्रसिद्धीप्रमुख जयश्री कुलकर्णी व त्यांच्या संपूर्ण टीमने हा सोहळा यशस्वी होण्यासाठी उत्तम आयोजन व नियोजन केले. सर्वच मान्यवरांनी सहज सेवा फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.