अलिबाग ः प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील विहूर येथील समुद्रकिनारी असलेल्या जागेच्या विक्री प्रकरणामुळे ग्रामस्थ संतापले असतानाच शिवसेना-शेकापमध्ये राजकारण तापले आहे. दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून शेकापच्या आरोपांना शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विहूर येथील त्या जागेवरून मागील काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. मुरूडच्या नवाबाच्या वारसांनी ही जागा मुंबईतील एका व्यक्तीला विकली असून तेथे त्याने कुंपण घालून काम सुरू केले आहे. याला विहूर ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे. शनिवारी यावरून संघर्ष टिपेला पोहचला. या कामाला विरोध करण्यासाठी विहूरचे लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही जागा गुरचरण असून तशी नोंद असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे, मात्र ग्रामपंचायत आणि आम्हाला अंधारात ठेवून या जागेची परस्पर गुपचूप विक्री करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जमिनीच्या कागदपत्रांवर चुकीचा अंमल देण्यात आला असून त्यात सरकारी अधिकार्यांनी जमिनीची विक्री करण्यात सहकार्य केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. ग्रामस्थ विरुद्ध नबाब, पोलीस, प्रशासन असा संघर्ष एकीकडे सुरू असतानाच या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना असा वाद रंगण्यास सुरुवात झाली आहे. शेकापने नाव न घेता अलिबाग मुरूडचे विद्यमान आमदार शिवसेनेचे महेंद्र दळवी यांच्यावर निशाणा साधला. आमदार दळवी यांचे यात साटेलोटे असल्याचा आरोप या माध्यमातून केला जात आहे. राजा व्यापारी, तर प्रजा भिकारीच होणार हेच या घटनेवरून दिसून येते, अशा शब्दांत शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी दळवी यांच्यावर तोफ डागली. शेकापकडून गंभीर आरोप होत असताना आमदार महेंद्र दळवी यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. ही जागा जर सरकारी गुरचरण असल्याचे सिद्ध झाले तर या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी ती ग्रामस्थांना मिळवून देईन. नव्हे तर लोकप्रतिनिधी म्हणून ती माझी जबाबदारी आहे, अशा शब्दांत त्यांनी शेकापला आव्हान दिले. हे प्रकरण न्यायालयात गेल्यास सर्व बाबी स्पष्ट होतील, असेही ते म्हणाले. माझे सर्व व्यवसाय अधिकृत आणि सर्वश्रुत आहेत. त्यामुळे मला आरोपांची पर्वा नाही, पण तुमच्या कुंडल्या बाहेर काढल्या तर पळता भुई थोडी होईल हे लक्षात ठेवा आणि हे काम मला नजीकच्या काळात करावे लागेल, असा इशाराही दळवी यांनी जयंत पाटील यांना दिला आहे.