Breaking News

ठाकरे सरकार असंवेदनशील; राज्यातील महिलांच्या सुरक्षेवरून राष्ट्रीय महिला आयोगाचे ताशेरे

मुंबई ः प्रतिनिधी
राज्य सरकार महिलांच्या बाबतीत असंवेदनशील आहे. यांना महिलांबाबत कोणतीही चिंता नाहीये. सरकारने याबाबत उत्तर द्यायला हवे, अशा कडक शब्दांत राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मुंबईत शुक्रवारी पहाटे साकीनाका परिसरात एका 34 वर्षीय महिलेवर टेम्पोचालकाने अमानुष लैंगिक अत्याचार केले. या महिलेचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाचे पथक मुंबईत दाखल झाले असून आयोगाच्या सदस्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. याबाबत त्यांनी सांगितले की, पोलिसांकडून आम्ही संबंधित घटनेची माहिती घेतली आहे. तिच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. त्यानंतर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटून विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. मगच यावर चर्चा करता येऊ शकेल. या घटनेवरून महिला आयोगाच्या सदस्यांनी ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले. मुंबईत गणपतीच्या आगमनाची तयारी सुरू असताना भररस्त्यात अशी घटना घडते याचा अर्थ इथे आरोपी निरंकुश आहेत. आरोपींना कोणाची भीती नाही आहे. आरोपींच्या मनात भीती असती तर त्या रात्री अशी घटना घडली नसती. गेल्या काही दिवसांपासून अनेक घटनांची माहिती घेतली आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत आठवडाभरात बलात्काराच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामागे राज्य शासनाचा निष्काळजीपणा आहे. कायदेव्यवस्था सरकारच्या नियंत्रणात नसल्यामुळेच या घटना घडल्या आहेत, असे महिला आयोगाच्या सदस्यांनी म्हटले आहे. संपूर्ण देशात प्रत्येक राज्यात महिला आयोग आहे. महाराष्ट्रात मात्र गेल्या दोन वर्षांपासून महिला आयोगाची नेमणूक करण्यात आलेली नाही. अशा वेळी कोणतीही पीडित महिला राज्य आयोगाकडेच मदतीसाठी जाते. इथे अशी कोणतीच संस्था नाही जिथे महिला आपली बाजू मांडू शकतील. महाराष्ट्रात महिला आयोग नसल्याने आम्हाला वेळोवेळी पोलिसांची मदत घ्यावी लागली. राज्य सरकार इतके असंवेदनशील कसे आहे की त्यांनी महिला आयोगाची स्थापना केलेली नाही. जर ते असते तर महिलांना न्याय मिळाला असता, असेही सदस्यांनी नमूद केले.

हातोड्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; उल्हासनगरमधील घटना

उल्हासनगर ः प्रतिनिधी
मुंबई, अमरावती, वसई, पिंपरीतील बलात्काराच्या घटना ताज्या असतानाच उल्हासनगर रेल्वेस्थानकानजीक एका 14 वर्षीय मुलीवर हातोड्याचा धाक दाखवत आरोपीने दुष्कृत्य केले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. पीडित अल्पवयीन तरुणी शिर्डीला आईला भेटून शुक्रवारी रात्री 9च्या सुमारास उल्हासनगरला घरी परतत होती. रेल्वेस्थानकातील स्कायवॉकवर तिला मित्र भेटल्याने ती त्यांच्यासोबत बोलत उभी होती. त्याच वेळी श्रीकांत गायकवाड हा माथेफिरू तिथे आला. त्याने हातातील हातोड्याने तिच्या मित्रांना धाक दाखवत पळवून लावले. त्यानंतर या तरुणीलाही हातोड्याचा धाक दाखवत बाजूला नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

अमरावतीमध्ये पुन्हा बलात्कार


अमरावती : जिल्ह्यातील रहीमापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वनोजा गावात राहणार्‍या सात वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर गावातीलच 20 वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वीच अमरावतीच्या येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याने ती गर्भवती राहिली होती. यातूनच तिने दोन दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply