Breaking News

सोनपावलांनी झाले गौराईचे आगमन

अलिबाग ः प्रतिनिधी

तीन दिवसांपूर्वी घरोघरी गणेशाचे आगमन झाले होते. त्यानंतर रविवारी (दि. 11) तीन दिवसांची पाहुणी असलेल्या गौराईचे घरोघरी आगमन झाले. गौरी आगमनामुळे महिलावर्गात उत्साहाचे वातावरण आहे. रविवारी दुपारनंतर मुली आणि महिला गौरी आणण्यासाठी गेल्या. कोकणात तेरड्याच्या गौरी आणल्या जातात. परंपरेनुसार माळरानावरून तेरड्याच्या गौरी घरोघरी वाजतगाजत आणण्यात आल्या. त्यानंतर तिची भेंडीच्या फुलांनी पूजा करण्यात आली. महिलांनी गौराईची सामुदायिक आरती केली. तिला आवडता भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात आला.  रात्री जेवणानंतर गौरीचे स्तवन झाले. महिलांची नाचगाणी, फुगड्या आदी खेळांना रंगत आली. गौरींच्या आगमनामुळे महिलावर्गात उत्साहाचे वातावरण असून गौरीच्या सणासाठी महिला मोठ्या संख्येने माहेरी आल्या आहेत. सोमवारी गौरीपूजन, तसेच तिखटाचा नैवेद्य दाखवला जाईल, तर मंगळवारी सायंकाळी गणपतीसोबत गौरींचे विसर्जन केले जाणार आहे.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply