Breaking News

देशात समूह संसर्ग; आयएमएचा इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना महामारीचा प्रादुर्भाव भारतातही दिवसागणिक झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या 10 लाखांच्या वर गेल्यानंतर समूह संसर्गाला सुरुवात झाली आहे. ही परिस्थिती भयावह असल्याचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने दिला आहे.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार रविवारी (दि. 19) सकाळपर्यंत भारतात कोरोना रुग्णांची संख्या 10 लाख 77 हजार 618 इतकी झाली आहे. यामध्ये 26 हजार 816 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे सहा लाख 77 हजार 423 जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर सद्यस्थितीत देशात तीन लाख 73 हजार 379 जणांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनाचा प्रसार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन लागू केला होता. चार टप्प्यांनंतर लॉकडाऊन शिथिल करण्यास सुरुवात केली. दुसरीकडे अनेक लोक नियमांची पायमल्ली करून वावरत आहेत. त्यामुळे समूह संसर्ग झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असून, राज्यात आतापर्यंत तीन लाख 937 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. यामध्ये आठ हजार 348 नवे कोरोनाबाधित रुग्ण

आढळले आहेत.

भारतातील वाढत्या रुग्णसंख्येसंदर्भात ‘आयएमए’ हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. मोंगा यांनी सांगितले की, एव्हाना गावखेड्यातही संसर्ग झाला असून, तेथील रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अशीच संख्या वाढत राहिल्यास तेथील परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे कठीण जाऊ शकते.

रुग्णांची विक्रमी वाढ

देशात रविवारी सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 38 हजार 902 नवे रुग्ण वाढले आहेत. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वांत मोठी वाढ आहे, तर 543 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात 10 लाख 77 हजार 618 लोक कोरोनाग्रस्त असून, त्यापैकी सहा लाख 77 हजार 423 जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर आतापर्यंत 26 हजार 816 जणांचा मृत्यू झाला आहे. दररोज वाढणारी रुग्णसंख्या चिंताजनक असून, गेल्या काही दिवसांपासून देशात दिवसाला 30 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची वाढ होत आहे.

शहरापर्यंत मर्यादित असणारा कोरोना विषाणू आता ग्रामीण भागातही वेगाने पसरत आहे. हा एक खराब संकेत असून असे वाटतेय की देशात समूह संसर्गाला सुरुवात झाली आहे.

डॉ. व्ही. के. मोंगा, अध्यक्ष ‘आयएमए’

हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply