Breaking News

कोरोनाचा ब्रह्मराक्षस!

चीनमधून पसरलेल्या महाभयंकर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता भारतातही वाढू लागला आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असून, सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेऊन विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.

कोरोना या तीन अक्षरी शब्दाने सध्या जगभरात धुमाकूळ माजवला आहे. चीनपाठोपाठ आता अन्य देशांतही या विषाणूची अनेकांना लागण झाली असून, यात काहींचा बळीदेखील गेला आहे. अशा या जीवघेण्या विषाणूने भारतात शिरकाव केल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या विषाणूमुळे होणार्‍या आजाराची तीव्रता आपल्या देशात तितकी नसली तरी वाढते रूग्ण चिंतेची बाब आहे. आतापर्यंत कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झालेला आहे. कर्नाटक आणि दिल्लीतील रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. ते लक्षात घेता केंद्र सरकारने कोरोना व्हायरसला अधिसूचित आपत्ती जाहीर केले आहे. या अंतर्गत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना राज्य आपत्ती निवारण निधीतून विशेष मदत करण्यात येणार आहे, तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. कोरोनाचा वाढता विळखा पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सार्क’ देशातील नेत्यांना कोरोनाविरोधात लढण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रातही शासनाच्या माध्यमातून निरनिराळे निर्णय घेण्यात येत आहेत. राज्यातील सिनेमागृह, नाट्यगृह, व्यायामशाळा, तरणतलाव बंद करण्यात आले आहेत. महापालिका, नगर परिषदा, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. याशिवाय सर्व शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा आणि राजकीय कार्यक्रमांची परवानगी रद्द करण्यात आली आहे. दहावी, बारावी आणि विद्यापीठातील परीक्षा मात्र ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार आहेत. राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईत तर जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. गर्दीमुळे करोनाचा संसर्ग होत असल्याने नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विविध पक्ष, संस्था, संघटना नियोजित कार्यक्रम स्थगित, रद्द करीत आहेत. एकीकडे कोरोनाची व्याप्ती वाढत असताना अफवा, गैरसमजांनाही ऊत आला आहे. वास्तविक, हे संकट आहे आणि त्याचा मुकाबला सर्वांनी मिळून नेटाने करणे अपेक्षित असताना काही अतिउत्साही मंडळी खुशाल विनोद करीत आहेत, तर काही जण अफवा पसरवून वातावरण गढूळ करीत आहेत. आधीच या आजारामुळे उद्योग-व्यवसाय अडचणीत आले आहेत. त्यात आता चुकीचे संदेश पसरवून उद्योजकांचे कंबरडे मोडले जात आहे. कोरोनाने सर्व क्षेत्रे व्यापलीत. कोरोनाचा फटका खेळाडू आणि कलावंतांनाही बसला आहे. देशांतर्गत बहुतेक सर्व स्पर्धा स्थगित, रद्द करण्यात आल्या आहेत, तर 19 मार्च ते 31 मार्चपर्यंत सर्व सिनेमा, टीव्ही शो, जाहिरातींचं शूटिंग, वेब शोजचे शूटिंग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज, इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन, इंडियन फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोशिएशनच्या बैठकीत एकत्रितपणे हा निर्णय घेण्यात आला आहे. एकूणच सर्वांनी कोरोनाचा धसका घेतल्याचे चित्र आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply