पनवेल : वार्ताहर
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील ‘सायमन गो बॅक’ म्हणत सायमन कमिशनला विरोध करणारे, ‘चले जाव’ आंदोलनाचे नेते तथा मुंबईचे पहिले सर्वांत तरुण महापौर म्हणून ओळख असलेल्या युसूफ मेहेरअली यांच्या 118व्या जयंतीनिमित्त पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागासह भारतातील आठ राज्यांत मागील सहा दशके शाश्वत ग्रामीण विकासाचे काम करणार्या युसूफ मेहेरअली सेंटरच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन पद्धतीने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा लहान व मोठा अशा दोन गटांत घेतली जाणार आहे. इयत्ता पाचवी ते आठवी लहान गटासाठी 1) युसूफ मेहेरअली, 2) आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, 3) साने गुरुजी या विषयांवर, तर इयत्ता नववी ते बारावी या मोठ्या गटासाठी 1) युसूफ मेहरअली आणि चलेजाव आंदोलन, 2) मिसाईल मॅन डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम, 3) पर्यावरण संवर्धनासाठी उपाय या विषयांवर 30 ओळींत निबंध लिहून पाठवावे. या स्पर्धेत निःशुल्क प्रवेश असून स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्या स्पर्धकांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे अनुक्रमे 1500 रुपये, 1000 रुपये, 500 रुपये अशी रोख रक्कम व सन्मानपत्र देण्यात येणार आहे, तरी सर्व शैक्षणिक संस्थाचालक वा शिक्षकांनी आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना या स्पर्धेत भाग घेण्यास प्रवृत्त करून सहभागी विद्यार्थ्यांचे निबंध 28 सप्टेंबर 2021 पूर्वी पीडीएफ फॉरमॅटमध्ये ऑनलाइन पद्धतीने गुगल लिंकद्वारे पाठविण्याचे आवाहन युसूफ मेहेरअली सेंटरचे प्रकल्प संचालक सुरेश रासम यांनी केले आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी किंवा चौकशीसाठी 9920320508, 8007170783, 9029800066, 9404808812 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही सुरेश रासम यांनी केले आहे.