मुरूड : प्रतिनिधी
शहरातील जुनीपेठ, लक्ष्मीखार, दस्तुरीनाका या ठिकाणच्या रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यामुळे त्यात पावसाचे पाणी साचून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. या रस्त्यावरच्या तलावातूनच मुरूडमधील भाविकांना गणपती आणावे लागले, तसेच याच खड्डेमय रस्त्यावरून बाप्पांना विसर्जनासाठी न्यावे लागले.शहरातील रस्ते दुरुस्तीकडे मुरूड नगर परिषदेने लक्ष न दिल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जुनीपेठ, लक्ष्मीखार भागातील रस्त्यावरील खड्ड्यांना आता तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. त्याचा विशेषतः पादचारी व दुचाकीस्वारांना मोठा त्रास होत आहे. चालकांना गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांमुळे छोटे-मोठे अपघात होत आहेत. तर कधी खड्ड्यातील पाणी अंगावर उडाल्याने शाब्दिक बाचाबाची झाल्याचे प्रसंग घडले आहेत. नागरिकांनी अनेकदा मागणी करूनसुद्धा खड्डे न बुजविल्यामुळे बाप्पांचे स्वागत व विसर्जनाच्या वेळी याच खाड्ड्यांमधून भाविकांना मार्ग काढावा लागला. जुनीपेठ ते दस्तुरीनाका या रस्त्यावर नेहमीच खड्डे पडत असतात. हा रस्ता काँक्रीट करण्यात यावा, अशी मागणी आहे, मात्र नगर परिषदेतील सत्ताधारी पक्षाच्या नाकर्तेपणामुळे गेली कित्येक वर्षे हा रस्ता खड्डेमय राहिला आहे. आता अंनत चतुर्दशीपर्यंत तरी शहरातील रस्त्यांवर पडलेले भलेमोठे खड्डे बुजवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.